*४५ प्रकारच्या अर्जांसाठी विशेष पोर्टल कार्यान्वित*
*मुंबई
मुंबई शहर जिल्ह्यातील मालमत्ताधारकांसाठी फडणवीस सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलले असून मुंबईतील मिळकत पत्रिकांचे (प्रॉपर्टी कार्ड) फेरफार आता पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. यामुळे सुमारे ३० लाख नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज भासणार नाही, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली.
विधानसभा नियम ४७ अन्वये निवेदन करताना महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, “मुंबई शहर आणि उर्वरित महाराष्ट्रातील प्रॉपर्टी कार्ड संधारणाची पद्धत वेगळी असल्याने मुंबईत संगणकीकरणात काही तांत्रिक अडचणी होत्या. मात्र, जनतेची वाढती मागणी लक्षात घेऊन शासनाने यावर मार्ग काढला आहे. आता मुंबईतील १९ महसूल विभाग आणि ४ नगर रचना योजनांमधील एकूण २७ हजार ८४७ संगणकीय मिळकतपत्रिका नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.”
*घरबसल्या अर्जाची सुविधा आणि ट्रॅकिंग*
नागरिकांना फेरफारासाठी अर्ज करण्यासाठी NIC पुणे यांनी epsitmumc.mahabhumi.gov.in ही विशेष आज्ञावली (सॉफ्टवेअर) तयार केली आहे. या पोर्टलमुळे नागरिकांना घरबसल्या अर्ज भरता येणार असून, त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती मेसेजद्वारे (SMS) मोबाईलवर मिळणार आहे. या पारदर्शक प्रणालीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि कामात गती येईल, असा विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला.
*४५ प्रकारचे फेरफार ऑनलाईन*
मुंबईत प्रथमच तब्बल ४५ प्रकारच्या फेरफारांसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने खरेदीखत, वारस नोंद, बक्षिसपत्र,भाडेपट्टा (Lease), गहाणखत, रोड सेटबॅक, आरक्षण आणि भूसंपादन प्रक्रिया यांचा समावेश आहे. नागरिकांनी आता आपल्या मालमत्तेच्या कामांसाठी mahabhumi.gov.in किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळाचा वापर करावा.” असे आवाहनही त्यांनी केले.
——





















