चित्रकार, व्यंगचित्रकार आणि लेखक-कवी प्रदीप म्हापसेकर यांच्या ‘व्ह्यूजपेपर’ या अभिनव कला प्रदर्शनाचे उद्घाटन फोर्ट येथील आर्मी-नेव्ही बिल्डिंगमधील आर्टिस्ट सेंटर गॅलरीत ज्येष्ठ विचारवंत व माजी खासदार कुमार केतकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार व राजकीय अभ्यासक विजय चोरमारे उपस्थित होते.
यावेळी बोलताना केतकर म्हणाले, “वर्तमानपत्रांचा कॅनव्हास म्हणून केलेला म्हापसेकरांचा वापर अत्यंत वेगळा आणि प्रयोगशील आहे. अशा प्रकारचा प्रयोग मी यापूर्वी पाहिलेला नाही.” त्यांनी या चित्रांतील प्रयोगशीलतेची तुलना कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या नव्या प्रयोगशील कवितेशी केली.
केतकर यांनी यावेळी चित्रकार एम. एफ. हुसैन यांच्या ‘श्वेतांबरा’ प्रदर्शनाचीही आठवण करून दिली. हुसैन यांनी जसे पांढऱ्या कॅनव्हास आणि वर्तमानपत्रांच्या मांडणीतून रसिकांना अर्थ शोधण्याचे आमंत्रण दिले होते, तसाच अनुभव म्हापसेकरांच्या चित्रांमधूनही मिळतो, असे त्यांनी नमूद केले.
याच प्रसंगी म्हापसेकर यांच्या ‘चौथी सीट’ या पुस्तकाचे प्रकाशन पत्रकार राजीव पै यांच्या हस्ते झाले. प्रकाशक संजय शिंदे यांनी सांगितले की,” या पुस्तकातून म्हापसेकर यांच्यातील ललित लेखक आणि कवी यांचे वेगळे रूप समोर येते.”
कला, साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा आर्टिस्ट सेंटरमधील प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद देणारा ठरला.



















