Home मुंबई *चेंबूरच्या सुभाष नगर परिसरातील बांधकामाधीन इमारतीवरून मजूर कोसळल्या प्रकरणी संबंधितांंवर कठोर कारवाई...

*चेंबूरच्या सुभाष नगर परिसरातील बांधकामाधीन इमारतीवरून मजूर कोसळल्या प्रकरणी संबंधितांंवर कठोर कारवाई करावी – महापौर रितू तावडे यांचे निर्देश*

81
0

चेंबूर येथील सुभाष नगर परिसरातील बांधकामाधीन असलेल्या इमारतीवरून सहा मजूर कोसळले. पैकी एकाचा मृत्यू झाला तर अन्य पाच जण जखमी झाले. शनिवार दि. २८ फेब्रुवारी ला दुपारी घडलेल्या या दुर्घटना स्थळी महापौर रितू तावडे यांनी तातडीने भेट दिली. तसेच घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात जाऊन जखमी मजुरांची विचारपूस देखील त्यांनी केली.

यावेळी उप महापौर संजय घाडी आणि विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर हे उपस्थित होते.

घटनास्थळी भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलताना महापौर रितू तावडे म्हणाल्या की,
“सदर दुर्घटनेबाबत प्राथमिक माहिती घेतली आहे. त्यानुसार, आदित्य राज या विकासकामार्फत इमारत बांधकाम सुरू आहे. या इमारतीवरून सहा मजूर खाली कोसळले. पैकी एका मजुराचा दुर्दैवाने मृत्यू ओढवला आहे. तर अन्य पाच जणांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मजूर नेमके कसे कोसळले, याची माहिती घेतली असता या बांधकाम स्थळी अतिशय निष्काळजीपणा करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. अशा प्रकारचा हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. कायद्याअंतर्गत कामगारांना सर्व प्रकारच्या सुरक्षा साधनांचा अवलंब करणे गरजेचे आहे. तसेच कार्यस्थळावर अभियंता वर्गाच्या देखरेखीखाली काम होणे आवश्यक आहे. अपघात झाला, तेव्हा अभियंता कुठे होता? यासह विविध बाबी तपासणी गरजेचे आहे.” असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.

बेजबाबदारपणे काम करणाऱ्या विकासक आणि कंत्राटदार यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच अशा घटना भविष्यात होऊ नये यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका व म्हाडा प्राधिकरणाने योग्य ती खबरदारी घ्यावी.”असेही निर्देशही महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत.

सदर घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी महापौर रितू तावडे या राजावाडी रुग्णालयात पोहचल्या. तिथे त्या म्हणाल्या की, “बांधकामाधीन इमारतीत सातव्या मजल्याचे काम सुरू असताना परांची कोसळून झालेल्या या अपघातात सहा जण खाली कोसळले. त्यापैकी एका मजुराचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. तर अन्य पाच जणांवर बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित राजावाडी रुग्णालय (घाटकोपर) येथे उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका मजुराची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. जखमी सर्व रुग्णांवर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत.”असे महापौरांनी नमूद केले.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here