मुंबई महापालिकेचा सन २०२६ – २७ या आर्थिक वर्षासाठीचा ८०९५२.५६ कोटी रुपयांचा आणि ८९.८४ कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प!
मुंबई महापालिकेचा सन २०२६ – २७ या आर्थिक वर्षासाठीचा ८०९५२.५६ कोटी रुपयांचा आणि ८९.८४ कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला. मुंबई मनपाचे आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना अर्थसंकल्प सादर केला. मुंबई महापालिकेचा सन २०२५–२६ या वर्षासाठीचा एकूण अर्थसंकल्प ७४,४२७.४१ कोटी रुपये इतका होता.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा अर्थसंकल्प ८.७७ कोटी रुपयांनी अधिक आहे. या अर्थसंकल्पात विकासकामांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच प्रशासकीय खर्चात बचत करण्याचे धोरण अवलंबिलेय.
अर्थ संकल्पातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे, ती म्हणजे मुंबई महापालिका आणखी काही ठेवी मोडण्याच्या तयारीत आहे!
मुंबई मनपाकडे किती कोटींच्या आहेत ठेवी?
मुंबई महापालिकेकडे सध्यस्थितीमध्ये एकूण ८१ हजार ४४९ कोटी ३२ लाख रुपयांच्या ठेवी बाकी आहेत. त्यातील ४४ हजार ८२६ कोटी २३ लाख रुपयांच्या ठेवी या ‘राखीव’ असल्यामुळेच, महापालिका या ठेवी मोडू शकत नाही.
मात्र उर्वरीत ३६ हजार ६२३ कोटी ९ लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचे अर्थसंकल्पात स्पष्ट केलो आहे.
नवे जाहिरात धोरण
दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार ४० बाय ४० फुटांपेक्षा मोठे जाहिरात फलक लावण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, तसेच पदपथांवर आणि इमारतींच्या गच्चींवर जाहिरात फलक लावण्यासही मनाई करण्यात आली असून, अशा प्रकारच्या जाहिरातींसाठी यापुढे कोणतीही नवी परवानगी दिली जाणार नाहीये. या निर्णयामुळे अनधिकृत आणि धोकादायक जाहिरात फलकांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाच्या माध्यमातून आतापर्यत आतापर्यंत १.३५कोटी नागरिकांनी लाभ घेतला आहे. यामध्ये बदल करून आता आपला दवाखानाच्या माध्यमातून मधुमेह आणि नेत्ररोगाकरिता ए आयद्वारे मोफत उपचार केले जाणार आहेत. २०२६-२७च्या अर्थसंकल्पात आरोग्य खात्यासाठी ५२३७ कोटी प्रस्तावित आहेत. मुंबईतील वाढतं प्रदूषण पाहता पालिकेकडून पर्यावरण आणि स्वच्छतेसाठी भरीव तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे, यासाठी एकूण १५९.८२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई महापालिका विकासकामांसाठीची तरतूद
बेस्ट अनुदान : १००० कोटी रुपये, शिक्षण विभाग : ४२४८.८ कोटी रुपये, घनकचरा व्यवस्थापन विभाग : ५८०.८२ कोटी रुपये, पर्जन्य जलवाहिनी विभाग : १८०० कोटी रुपये, कोस्टल रोड प्रकल्प : ९५० कोटी रुपये, रस्ते आणि वाहतूक विभाग : ६८७५ कोटी रुपये, पूल विभाग : ९६५०कोटी रुपये, आरोग्य विभाग : २२१९.७१ कोटी रुपये, जल अभियंता विभाग : १३३० कोटी रुपये, पाणी पुरवठा प्रकल्प खाते : ६४७५ कोटी रुपये, मलनि:सारण प्रचालन विभाग : ७०० कोटी रुपये, मलनि:सारण प्रकल्प खाते : ९६० कोटी रुपये, मलनि:सारण प्रकल्प कामे : ६६००कोटी रुपये, उद्यान आणि प्राणिसंग्रहालय : ८०० कोटी रुपये
***
















