Home मुंबई मुंबई महानगरपालिका शिक्षण अर्थसंकल्प २०२६-२७ : ४२४८.०८ कोटींची तरतूद; कौशल्य, गुणवत्ता, डिजिटल...

मुंबई महानगरपालिका शिक्षण अर्थसंकल्प २०२६-२७ : ४२४८.०८ कोटींची तरतूद; कौशल्य, गुणवत्ता, डिजिटल शिक्षणावर भर

61
0

मुंबई
महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा २०२६-२०२७ वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून यंदा शिक्षण, कौशल्य विकास, डिजिटल सुविधा आणि सहशालेय उपक्रमांना मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
या अर्थसंकल्पाचा एकूण आवाका ४२४८.०८कोटी रुपये इतका आहे. त्यात महसुली उत्पन्न-खर्चासाठी ३७५८.०८कोटी रुपये तर भांडवली कामांसाठी ४९०.०० कोटी रुपये इतकी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. मागील वर्षी २०२५-२६मध्ये महसुली अंदाज ३५४४.३४ कोटी रुपये आणि भांडवली तरतूद ४११.३०कोटी रुपये होती.

महानगरपालिकेच्या शिक्षण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षण घेत असून ९३१प्राथमिक शाळांमध्ये २,७६,११५ विद्यार्थी, १८७ माध्यमिक शाळांमध्ये ३४,३११विद्यार्थी, तर १९ विशेष शाळांमध्ये ८४५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसंच ३७७ अनुदानित शाळांमध्ये ९६,५१३ विद्यार्थी, पुर्वप्राथमिक वर्गांमध्ये ४०,५९५ विद्यार्थी, तर संलग्न २१ शाळांमध्ये १३,३१६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याचबरोबर, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मिशन संपूर्ण आणि मिशन सफल राबविण्यात येणार आहेत. यात एनसीसी प्रशिक्षण, स्काऊट-गाईड उपक्रम, संगीत-कला विकास, १५० शाळांमध्ये कला वर्ग, तीन आर्ट एक्सेलेन्स सेंटर तसंच कौशल्याधारित शिक्षणाचा समावेश आहे. ‘निपुण भारत’ अभियानाअंतर्गत इयत्ता १ ते ४ मधील विद्यार्थ्यांच्या वाचन-लेखन व गणित कौशल्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

शैक्षणिक निकालांमध्ये पालिका शाळांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून २०२५ मधील परीक्षेत ८९ शाळांचा १०० % निकाल लागला, तर २४७ शाळांचा सरासरी निकाल ९२.९२ % नोंदवण्यात आला. तसंच २०२६-२७ मध्ये सिबिएसई पद्धतीची नवीन शाळा सुरू करण्याचे नियोजन असून डिजिटल शिक्षण, प्रयोगशाळा, कौशल्य प्रशिक्षण आणि विविध सहशालेय उपक्रमांसाठीही मोठ्या प्रमाणावर निधी राखून ठेवण्यात आला आहे. एकूणच, पालिकेचा यंदाचा शिक्षण अर्थसंकल्प हा तंत्रज्ञान आधारित आणि सर्वांगीण शिक्षणाला चालना देणारा असल्याचे दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here