*२१ सुवर्ण, २१ रौप्य आणि २२ कांस्य पदकांसह तब्बल ६४ पदकांवर उमटवली मोहोर*
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने राजस्थान येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘अखिल भारतीय अग्निशमन सेवा क्रीडा स्पर्धा २०२६’ मध्ये चमकदार कामगिरी केली. तब्बल ६४ पदकांवर मोहोर उमटवत मुंबई अग्निशमन दलाने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
राजस्थानमधील उदयपूर येथे दिनांक २७ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत अखिल भारतीय अग्निशमन सेवा क्रीडा स्पर्धा पार पडल्या. देशभरातील १२०० हून अधिक अग्निशमन दलांचे जवान या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत मुंबई अग्निशमन दलाच्या ४२ जवानांच्या संघाने सहभाग नोंदवत एकूण ६४ पदके जिंकली. यात २१ सुवर्ण, २१ रौप्य आणि २२ कांस्य पदकांचा समावेश आहे. दहा महिला अग्निशमन जवानांनीही स्पर्धेत सक्रियपणे भाग घेत पदकांच्या यादीत योगदान दिले.
स्पर्धेत पार पडलेल्या अग्निशमन संबंधीच्या सर्व कवायतींमध्येही मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी कौशल्य दाखवत उत्कृष्ट कामगिरी केली. केंद्र अधिकारी संकेत नाईक यांनी टेबल टेनिस, लॉन टेनिस आणि बॅडमिंटनमध्ये १२ पदके जिंकली.
स्पर्धेतील विजेत्या पथकाचे नेतृत्व उप प्रमुख अग्निशमन अधिकारी डॉ. दीपक घोष यांनी केले. तसेच डॉ. घोष यांनी वैयक्तिक अग्नी कवायत स्पर्धेत (५५ वर्षांवरील वयोगटात) दोन रौप्य पदकेही पटकावली.
या सर्व स्पर्धकांचे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर ) डॉ. अश्विनी जोशी, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी, प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी अभिनंदन केले आहे.
*यापूर्वीही उत्तुंग कामगिरी*
मुंबईकरांचा आगीपासून बचाव करण्यासाठी मुंबई अग्निशमन दल नेहमीच समर्पित भावनेने कार्यरत असते. यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्यास विविध स्पर्धांमध्येदेखील सहभाग नोंदवत अग्निशमन दलाच्या जवानांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. दिनांक २८ जून ते ६ जुलै २०२५ दरम्यान अमेरिकेतील अलाबामा प्रांतात बर्मिंगहॅम येथे संपन्न झालेल्या जागतिक पोलिस व अग्निशमन क्रीडा स्पर्धेत (World Police & Fire Games 2025) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने एकूण ०४ जिंकली.
यासोबतच जानेवारी २०२५ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय अग्निशमन क्रीडा स्पर्धेत मुंबई अग्निशमन दलाने १६ सुवर्णांसह एकूण ४० पदके जिंकून उज्ज्वल कामगिरी केली होती.
***






















