Home मुंबई *सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरण

*सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरण

55
0

*कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर प्रहार; उद्या सुनावणी*

औरंगाबाद : शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील हत्या प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात बाजू मांडताना कायद्यातील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधले.

नेमका मुद्दा काय?

सुनावणी दरम्यान पोलीस खाते आणि गृहखात्याच्या मुख्य सचिवांच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. मात्र, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी BNS १९६ (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता) मधील एका मोठ्या त्रुटीवर बोट ठेवले.

यामध्ये कोठडीतील मृत्यूनंतर मॅजिस्ट्रेटने चौकशी केल्यानंतर पुढे नक्की कोणती पावले उचलावीत, याबाबत कायद्यात स्पष्ट तरतूद नाही. केंद्र आणि राज्य सरकारने आजवर या कायद्यात आवश्यक सुधारणा किंवा दुरुस्ती केलेली नाही.

गृहमंत्र्यांना न्यायालयात बोलवा – आंबेडकरांची मागणी

न्यायालयाला विनंती करताना आंबेडकर म्हणाले की, सध्या ज्या अधिकाऱ्यांना न्यायालयात पाचारण करण्यात आले आहे, त्यांना केवळ अंमलबजावणीचे अधिकार आहेत, धोरणात्मक निर्णय घेण्याचे नाही. त्यामुळे, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी न्यायालयाने स्वतः या कायद्यातील त्रुटी भरून काढाव्यात किंवा थेट गृह मंत्र्यांना न्यायालयात बोलावून ‘हा अपूर्ण कायदा पूर्ण करणार का?’ असा जाब विचारावा.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या या आक्रमक युक्तिवादानंतर न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पुढील सुनावणी उद्या सकाळी निश्चित केली आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत न्यायालय सरकारला काय निर्देश देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

परभणीतील पोलीस कोठडीत मृत्यू पावलेले शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या चौकशी प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना ८ दिवसांत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एसआयटीची घोषणा केली होती.

यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाबाई सूर्यवंशी उपस्थित होत्या.

——-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here