Home मुंबई *विरोधी पक्षनेते राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन...

*विरोधी पक्षनेते राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ*

52
0

*अजित पवार यांच्या विमान अपघातावर जनतेच्या मनात शंका, निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, शपथविधीला घाई पण चौकशीला विलंब का?*

*राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग, कोयता गँग सारख्या प्रवृत्तींना सरकारकडून खतपाणी.*

मुंबई, दि. ४ फेब्रुवारी २०२६

चीनच्या सीमेवरील कारवायांबद्दल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अत्यंत महत्वाचे व गंभीर प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला परंतु मोदी सरकार मात्र त्यांना बोलू देत नाही. भारत सरकार चीन प्रश्नी काहीतरी सत्य लपवत आहे म्हणून विरोधी पक्ष नेत्यालाही संसदेत बोलू दिले जात नाही हे अत्यंत निषेधार्ह असून मोदी सरकार संसदेच्या सर्व संकेत, परंपरा व नियम पायदळी तुडवत हुकूमशाहीपद्धतीने वागत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी त्यांच्या *फोर स्टाफ ॲाफ डेस्टिनी* या पुस्तकात ‘डंके की चोट पर’ चीन प्रकरणावर लिहिले असून मोदी सरकारने जाबबादारी झटकल्याचे उघड आहे, हाच मुद्दा राहुल गांधी लोकसभेत मांडत होते. चीन प्रश्नावर संसदेत चर्चा व्हायला पाहिजे व चीन सीमेवर काय झाले, हे जाणून घेण्याचा अधिकार भारत मातेच्या सर्व सुपुत्रांना आहे, पण सरकार मात्र विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलूच देत नाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही चीनने भारताच्या हद्दीत प्रवेश केल्याचा मुद्दा मांडला असता मोदी सरकारने त्यांना जेलमध्ये टाकले आहे, असेही सपकाळ म्हणाले..

अजित पवार विमान अपघातावर संशय..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत. यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अजित पवार यांचे शेवटचे संभाषण व्हायरल झाले आहे पण ब्लॅकबॉक्स मधील संभाषण अद्याप जाहीर झालेले नाही व चौकशीही होत नाही, हा विलंब अनाकलनीय आहे, त्यामुळे संशय बळावत चालला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली नाही. शपथविधीला जेवढी घाई केली तेवढी अपघाताच्या चौकशीसाठी करण्यात आली नाही.
अजित पवार यांच्यासारख्या शिस्तप्रिय लोकनेत्याच्या बाबतीत असा अपघात व्हावा हे पटत नाही. जोपर्यंत या अपघाताचा कार्यकारणभाव स्पष्ट होत नाही तोपर्यंत असे प्रश्न उपस्थित होतच राहणार. या अपघाताने अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत आणि सरकार हे प्रकरण ज्यापद्धतीने हाताळत आहे त्यावर शंका आणखी वाढत आहेत. अंत्यसंस्काराच्या दुसऱ्या दिवशी फडणवीस यांनी एक पत्र तातडीने केंद्रीय मंत्र्याला पाठवले व त्याचे उत्तरही आले आणि तेथेच हे प्रकरण थांबल्याने पाणी कुठेतरी मुरतेय असे सपकाळ म्हणाले.

एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “राज्याला पुर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. कोयता गँग, वाळू माफिया, ड्रग्ज माफिया, आका, खोके आणि बिश्नोई गँग हे त्याचेच परिणाम आहेत. सरकारच अशा प्रवृत्तींना खतपाणी घालत आहे.” असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here