Home Uncategorized *मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची कडक कारवाई*

*मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची कडक कारवाई*

56
0

*‘वायू गुणवत्ता मापन प्रणाली’ बसविण्यास टाळाटाळ करत नियमभंग करणाऱ्या १०६ बांधकामांना ‘कार्य स्थगिती’ नोटीस*

मुंबईतील वायूप्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे सातत्याने विविधस्तरीय कार्यवाही करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पुर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत असलेल्या उपाययोजना व कार्यवाहींचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरु असलेल्या सर्व बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी ‘एअर क्वालिटी सेन्सर्स’ अर्थात ‘वायू गुणवत्ता मापन प्रणाली’ कार्यान्वित करणे, यापूर्वीच बंधनकारक करण्यात आले आहे. तर, १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये ‘रेफरन्स ग्रेड एअर क्वालिटी मॉनिटर’ बसविण्याचे आदेशदेखील यापूर्वीच देण्यात आले आहेत. मात्र, काही बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी संबंधित आदेशांनुसार अत्यावश्यक असणारी ‘वायू गुणवत्ता मापन प्रणाली’ बसविण्यात आली नसल्याचे आढळून येत आहे. अशा सर्व प्रकल्पांना काम बंद करण्याच्या नोटीस तातडीने देण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिका-यांना देण्यात आले होते. यानुसार गुरुवारी सायंकाळ पर्यंत १०६ बांधकामांना ‘कार्य स्थगिती’ नोटीस देण्यात आल्या आहेत. यामध्ये खासगी बांधकामांसह रेल्वे पूल बांधकाम, एस आर ए प्रकल्प, म्हाडा प्रकल्प इत्यादी बांधकाम प्रकल्पांचाही समावेश आहे. या अनुषंगाने नियमित पाहणी सुरु असून नियमभंग करणाऱ्या उर्वरित बांधकामांना नोटीस देण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे.
..

याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, ज्या बांधकाम प्रकल्पांवर अद्याप ‘वायू गुणवत्ता मापन प्रणाली’ (Air Quality Sensors) कार्यान्वित नाही, अशा ठिकाणी तात्काळ नोटीस बजावून अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही यंत्रणा बसविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन मे २०२५ पासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. मात्र, वारंवार पाठपुरावा करुन देखील प्रतिसाद न देणा-या प्रकरणी त्वरित काम बंद करण्याच्या नोटीस देण्यात येत आहेत.
..

दरम्यान, वायूप्रदूषण प्रकरणी पुढील न्यायालयीन सुनावणी शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. पूर्वनियोजित कृती आराखड्यानुसार प्रत्यक्ष स्थळभेटी व पाहणी सुरू ठेवण्याचे आदेश महानगरपालिका प्रशासनाने सर्व विभागस्तरीय पथकांना दिले आहेत. या अंतर्गत प्रत्यक्ष तपासणी, नोंदवही निरीक्षण आणि तात्काळ कारवाईवर भर देण्यात येत आहे. ही कारवाई केवळ बांधकाम क्षेत्रापुरतीच मर्यादित नसून नियमांचे पालन न करणाऱ्या बेकरी युनिट्सवरही ‘कार्य स्थगिती’ नोटीस देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभाग यांना देण्यात आले आहेत. धूर, इंधन वापर आणि उत्सर्जन मानकांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकरणी कडक कारवाई करण्यात येणार आहे.
..

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसून नियम पाळणाऱ्यांना सहकार्य, तर नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे. महानगरपालिका प्रशासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविधस्तरीय उपाययोजनांमुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा होत असून, बहुतेक ठिकाणी हवेची गुणवत्ता ‘समाधानकारक’ वा ‘मध्यम’ श्रेणीत आहे. वायूप्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेची ही कारवाई नियमितपणे व अधिकाधिक प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचेही उप आयुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल) श्री. अविनाश काटे यांनी कळविले आहे. त्याचबरोबर गुरुवार दि २२ जानेवारी
रोजी सायंकाळपर्यंत ‘वायु गुणवत्ता मापन प्रणाली न बसविणाऱ्या १०६ बांधकामांना तातडीने काम बंद करण्याची नोटीस देण्यात आल्याची माहिती देखील श्री काटे यांनी दिली असून या बांधकामांमध्ये शीव परिसरातील रेल्वे पूल बांधकामासह एच पूर्व विभागातील म्हाडा प्रकल्प व ‘के पूर्व’ विभागातील ‘एस आर ए’ प्रकल्पांच्या बांधकामांचाही समावेश आहे, असेही त्यांनी कळविले आहे.
..

सध्या मुंबईत एकूण २८ ठिकाणी ‘सतत वातावरणीय वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे’ (CAAQMS) कार्यरत आहेत. त्या पैकी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अखत्यारित १४ केंद्रे, भारतीय उष्णकटिबंधीय मौसम विज्ञान संस्थान (Indian Institute of Tropical Meteorology) अंतर्गत ९ केंद्रे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील ५ केंद्रे कायर्रत आहेत. ही सर्व केंद्रे प्रमाण दर्जाची केंद्रे असून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मोजमाप, कॅलिब्रेशन, गुणवत्ता हमी आणि डेटा प्रमाणिकरणासाठी राष्ट्रीय मानके व प्रोटाकॉलचे पालन करतात. या केंद्रांद्वारे उपलब्ध होणारी आकडेवारी ही केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या संकेतस्थळासह ‘समीर’ या ‘भ्रमणध्वनी ऍप’वर उपलब्ध आहे. कृपया नागरिकांनी आपल्या परिसरातील हवा गुणवत्तेची आकडेवारी बघण्यासाठी या अधिकृत ऍपचा वापर करावा, असे आवाहन या निमित्त महानगरपालिका प्रशासनाद्वारे पुन्हा एकदा करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी उघड्यावर कचरा जाळणे टाळावे आणि महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असेही आवाहन प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात येत आहे.
===

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here