Home Uncategorized *बेलासिस उड्डाणपुलाचे काम पूर्ण, विक्रमी वेळेत व मुदतपूर्व कालावधीत उड्डाणपूल तयार!*

*बेलासिस उड्डाणपुलाचे काम पूर्ण, विक्रमी वेळेत व मुदतपूर्व कालावधीत उड्डाणपूल तयार!*

50
0

ताडदेव – नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणाऱया बेलासिस उड्डाणपुलाची अंतिम कामे विक्रमी कालावधीत म्‍हणजेच अवघ्या १५ महिने ६ दिवसांत पुर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे, निविदा अटी – शर्तींनुसार या उड्डाणपुलाच्या कामासाठी अजून ४ महिन्यांचा अवकाश आहे. या पुलाच्‍या बांधकामाचा कार्यादेश (Work Order) सप्‍टेंबर २०२४ मध्‍ये देण्‍यात आले. तर, प्रत्‍यक्ष कामकाजास १ ऑक्‍टोबर २०२४ रोजी सुरूवात झाली. रेल्‍वे रुळांवरील कामे रेल्‍वे विभागामार्फत तर तुळयांचे मजबुतीकरण (Girder Bracing), पुलाच्‍या प्रवास पृष्‍ठभागाची रचना (Deck Sheet), स्लॅब कास्टिंग, दोन्‍ही पोहोच मार्गांची कामे महानगरपालिकेने पूर्ण केली. महानगरपालिका पूल विभाग (Bridges Department) , रेल्वे विभाग, संबंधित स्थानिक प्रशासकीय विभाग कार्यालय (Ward Office) आणि वाहतूक पोलिस यांच्यातील उत्कृष्ट समन्वय, नियोजनबद्ध कार्यपद्धती व अहोरात्र परिश्रमांमुळे हा उड्डाणपूल प्रकल्प मुदतीपूर्वी यशस्वीरित्या पूर्ण करणे शक्य झाले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल खात्यामार्फत महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा, विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मुंबईकर नागरिकांचा प्रवासात कमीत कमी वेळ खर्ची व्हावा, यासाठी विविध ठिकाणी उड्डाणपूल उभारणे, लोहमार्गावर तुळया टाकून पूल उभारणे, रस्त्यांची गुणवत्ता उत्तम असावी यासाठी सिमेंट क्राँकिटच्या रस्त्यांची बांधणी करणे आदी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. याच अनुषंगाने ब्रिटिशकालीन १३० वर्षे जुना बेलासि‍स पूल पाडून त्‍याची पुनर्बांधणी करण्यात आली आहे.

मुंबई सेंट्रल स्‍थानकानजीक रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन बेलासिस उड्डाणपूल धोकादायक जाहीर झाल्‍यानंतर त्‍याच्‍या पुनर्बांधणीचे काम महानगरपालिकेने हाती घेतले. महानगरपालिका पूल विभाग व रेल्‍वे विभागाचे अभियंते पहिल्‍या दिवसापासूनच पुलाचे काम विक्रमी वेळेत पुर्ण करण्‍यासाठी प्रयत्‍नशील होते. त्‍यासाठी संपूर्ण कामाची विभागणी करून सुक्ष्‍म नियोजन करण्‍यात आले. कामकाजाच्‍या उप भागांची (Sub-activity) कालमर्यादा निश्चित करण्‍यात आली. तसेच, कोणत्‍याही परिस्थितीत कालमर्यादा पाळली जाईल, याची दक्षता अभियंत्‍यांनी घेतली. या प्रयत्‍नात स्थानिक प्रशासकीय विभाग कार्यालय, वाहतूक पोलिस अधिकारी यांची मोलाची साथ लाभली.

बेलासिस पुलाची एकूण लांबी ३३३ मीटर आहे. त्‍या पैकी १३८.३९ मीटर पूर्वेला आणि १५७.३९ मीटर पश्चिमेला आहे. तर, रेल्‍वे हद्दीत ३६.९० मीटर लांब आहे. वाहतूक मार्ग (Carriage Way) लांबी ७ मीटर असून दोन्‍ही बाजूला पुरेशा रूंदीचे पदपथ (Foothpath) अशी पुलाची आखणी आहे. या पुलाचे काम पुर्ण करणे आव्‍हानात्‍मक होते. कामाची अंमलबजावणी सुरू असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्‍यात ‘बेस्‍ट’ वाहिन्‍यांचे स्‍थलांतरण, पुल बांधकामास अडथळा ठरणारी १३ बांधकामे हटवून पर्यायी घरांचे वाटप करणे, पुलानजीकच्‍या एका गृहनिर्माण संस्‍थेची (Housing Society) बाधित होणारी सीमाभिंत हटविणे, माननीय उच्‍च न्‍यायालयासमोरील खटला आदींचा समावेश होता. त्‍यावर मात करत प्रकल्‍प कामकाजास कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता सर्व अभियंत्‍यांनी घेतली. सर्व कामाची आखणी नियोजनबद्धपणे केल्‍याने पावसाळ्याच्‍या ४ महिन्‍यांच्‍या कालावधीत देखील काम अविरत सुरू होते. त्‍यामुळे बेलासिस पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पुर्ण करण्‍यात यश मिळाले आहे.

दक्षिण मुंबईतील जहांगीर बोमन बेहराम मार्गावरील (पूर्वीचे बेलासिस रोड) बेलासिस पूल हा मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेव या भागांना लोहमार्गावरून पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. बेलासिस पुलाच्या पुनर्बांधणीमुळे दोन वर्षापासून बाधित झालेली पूर्व – पश्चिम वाहतुकीसाठीची सुविधा पुन्हा प्रस्थापित होणार आहे. बेलासिस पूल कार्यान्वित झाल्यावर जहांगीर बोमन बेहराम मार्ग (पूर्वीचे बेलासिस रोड), दादासाहेब भडकमकर मार्गावरील (ग्रॅन्ट रोड), विशेषतः पठ्ठे बापूराव मार्ग व महालक्ष्मी स्‍थानक पुलावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर म्‍हणाले की, “महानगरपालिका प्रकल्प कार्यान्वित यंत्रणांनी काटेकोर नियोजनासोबत तितकीच शिस्तबद्ध व प्रभावी अंमलबजावणी केल्यास, विविध आव्हाने असतानाही विकासकामे मुदतीपूर्वी यशस्वीरीत्या पुर्ण करता येतात, हे बेलासिस उड्डाणपूल प्रकल्‍पावरून दिसून येत आहे. पायाभूत सुविधांची कामे प्राधान्याने राबविताना नागरिकांना कमीत कमी असुविधा होईल याची दक्षता घेत, ती कामे गतीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण केल्यास त्याचा लाभ वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचू शकतो, या सकारात्मक भूमिकेतून हे काम करण्यात आले आहे. पायाभूत सुविधांची कामे याच पद्धतीने पुर्ण करण्‍यासाठी महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रयत्‍नशील राहतील, याची दक्षता घेण्‍यात येत आहे. बेलासिस पुलाची अंतिम कामे (Finishing) दि. ६ जानेवारी २०२६ रोजी पुर्ण झाली आहेत. भार चाचणी (Load Test), संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र (Structural Stability Certificate) , सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. तसेच पूल कार्यान्वित करण्यासाठी रेल्वे विभागाचे ना – हरकत प्रमाणपत्र (NOC) प्राप्त झाल्यानंतर वाहतूक पोलिसांच्‍या समन्‍वयाने बेलासिस पूल वाहतुकीस खुला करण्यात येईल, असेदेखील बांगर यांनी नमूद केले.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here