Home मुंबई *भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री राज के. पुरोहित यांचे निधन, उपसभापती...

*भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री राज के. पुरोहित यांचे निधन, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भावपूर्ण श्रद्धांजली*

55
0

*”विधिमंडळात प्रतोदांना अधिकार व सोयी-सुविधा मिळवून देण्यात राज के. पुरोहित यांचा मोलाचा वाटा” – डॉ. नीलम गोऱ्हे*

मुंबई,
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज के. पुरोहित यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

राज के. पुरोहित यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “राज के. पुरोहित हे अत्यंत निष्ठावान, अभ्यासू आणि स्पष्टवक्ते लोकप्रतिनिधी होते. विधानसभेत जनतेचे प्रश्न बुलंद आवाजात मांडण्याची त्यांची भूमिका नेहमीच लक्षवेधी होती. विधिमंडळातील दोन्ही सभागृहात प्रतोदांना अधिकार व आवश्यक सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि त्याला यशही मिळाले. दक्षिण मुंबईतील शिवसेनेच्या अनेक लोकहिताच्या कामांसाठी मला त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या जाण्याने एक अनुभवी मार्गदर्शक आपण गमावला आहे,” असेही त्या म्हणाल्या.

मुंबई भाजपच्या राजकारणात राज के. पुरोहित यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते. राज्य सरकारमध्ये मंत्रिपद भूषवताना त्यांनी प्रशासकीय अनुभव, लोकाभिमुख दृष्टिकोन आणि कार्यक्षम नेतृत्व यांचा प्रभावी प्रत्यय दिला, असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

“राज के. पुरोहित यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो,” अशा शब्दांत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here