मुंबई दिनांक ९: देशाच्या उपराष्ट्रपतीपदी सी.पी. राधाकृष्णन यांची झालेली निवड आम्हा सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे, त्यांचे मनापासून अभिनंदन अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले राधाकृष्णन यांची एनडीए आघाडीतर्फे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवड झाली तेव्हाच त्यांच्या विजयाची खात्री होती आणि आघाडीतला घटक पक्ष म्हणून शिवसेनेने आपला पाठिंबा त्यांना दिला होता, असे सांगून एकनाथ शिंदे यांनी राधाकृष्णन यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात ते म्हणतात की, राज्यपाल म्हणून राधाकृष्णन यांनी राज्यात दिलेले योगदान आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले मार्गदर्शन अतिशय बहुमूल्य आहे. विविध विकासकामे, शैक्षणिक सुधारणा त्याचप्रमाणे सामाजिक ऐक्य व सद्भावना वाढविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय होते.
तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या राधाकृष्णन यांनी वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सक्रियपणे जनसेवा करण्यास सुरुवात केली. दोन वेळा खासदार होऊन कालांतराने तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे उपराज्यपाल म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे काम पाहिलं आहे. त्यांचा हा प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभव त्याचप्रमाणे प्रामाणिकपणा व संवेदनशील दृष्टीकोन हा देशवासीयांसाठी निश्चितच अतिशय महत्त्वाचा ठरेल असे सांगून एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या जनतेतर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.




















