Home Uncategorized *बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या प्रारुप प्रभाग रचनेबाबत ४८८ हरकती आणि सूचना प्राप्‍त*

*बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या प्रारुप प्रभाग रचनेबाबत ४८८ हरकती आणि सूचना प्राप्‍त*

94
0

*हरकती व सूचनांवर दिनांक १०, ११ व १२ सप्‍टेंबर २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण केंद्रात सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.३० दरम्यान सुनावणी*

*हरकतदारांनी नेमून दिलेल्‍या दिवशी वेळेत उपस्थित राहण्‍याचे महानगरपालिकेचे आवाहन*

बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रारूप प्रभाग रचनेबाबत विहित मुदतीत एकूण ४८८ हरकती आणि सूचना प्राप्‍त झाल्‍या आहेत. या प्राप्‍त हरकती आणि सूचनांवर दिनांक १०, ११ आणि १२ सप्‍टेंबर २०२५ या तीन दिवसांत महाराष्‍ट्र शासनाने नियुक्‍त केलेल्‍या प्राधिकृत अधिकारी यांच्‍यामार्फत सुनावणी घेतली जाणार आहे.

महाराष्‍ट्र शासनाच्‍या नगर विकास विभागाने बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध टप्‍पे निश्चित केले आहेत. या अंतर्गत दिनांक २२ ऑगस्‍ट २०२५ रोजी प्रारूप प्रभागांच्‍या भौगोलिक सीमा प्रसिद्धीची अधिसूचना जारी करण्‍यात आली. त्‍यावर शुक्रवार, दि २२ ऑगस्‍ट २०२५ ते गुरूवार, दि ४ सप्‍टेंबर २०२५ दुपारी तीन वाजेपर्यंत या मुदतीत हरकती व सूचना मागविण्‍यात आल्‍या होत्‍या. या कालावधीत एकूण ४८८ हरकती सूचना प्राप्‍त झाल्‍या आहेत.

प्रारूप प्रभाग रचनेच्‍या प्रस्‍तावावरील प्राप्‍त हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्‍यात येणार आहे. मुंबईत मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्‍हाण केंद्र, जनरल जगन्‍नाथराव भोसले मार्ग या ठिकाणी दिनांक १०, ११ आणि १२ सप्‍टेंबर २०२५ या तीन दिवसांत सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्‍यान सुनावणी घेतली जाणार आहे.

या सुनावणीसाठी हरकतदारांनी नेमून दिलेल्‍या दिवशी वेळेत उपस्थित राहावे. ज्‍या हरकत/ सूचनादारांना सुनावणी सूचनापत्र मिळाले नसल्‍यास त्‍यांनी उप करनिर्धारक व संकलक (निवडणूक), निवडणूक मुख्‍य कार्यालय, तिसरा मजला, महानगरपालिका विस्‍तारित इमारत, बृहन्‍मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, मुंबई – ४००००१ येथे संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने यांनी केले आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here