Home राजकीय चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीमुळे मंत्रालयात सोमवारी सामसूम

चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीमुळे मंत्रालयात सोमवारी सामसूम

186
0

चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीमुळे मंत्रालयात सोमवारी सामसूम?

मुंबई – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी दिनानिमित्त राज्य मंत्रिमंडळाची आगामी आठवड्यातील साप्ताहिक बैठक यंदा मुंबईऐवजी अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील चौंडी, तालुका जामखेड) येथे ६ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि सचिव स्तरावरील अधिकारी या बैठकीसाठी चौंडी येथे उपस्थित राहणार असल्याने मंत्रालयात ५ मे (सोमवार) ते ७ मे (बुधवार) दरम्यान शुकशुकाट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सामान्यतः ही बैठक मंत्रालयातील सातव्या मजल्यावर किंवा सह्याद्री अतिथिगृहात होत असते. मात्र यंदा चौंडी येथे होणाऱ्या या ऐतिहासिक बैठकीमुळे प्रशासनाचा संपूर्ण फौजफाटा अहमदनगरकडे रवाना होणार आहे.

चौंडी येथील बैठकीचा प्रस्ताव विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला होता. त्यांच्या आग्रहामुळेच ही बैठक चौंडी येथे होत आहे. बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे.

या बैठकीसाठी अंदाजे २००० व्यक्ती चौंडी येथे उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये मंत्री, खासगी सचिव, विशेष कार्यकारी अधिकारी, स्वीय सहाय्यक, पोलीस व गृह विभागातील अधिकारी, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, होमगार्ड आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे.

विशेष बाब म्हणजे, या बैठकीसाठी येणाऱ्या मंत्र्यांसह शासकीय अधिकाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था स्थानिक महिला बचत गटांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया या संपूर्ण तयारीचा आढावा घेत आहेत.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडी येथे प्रथमच होत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर सरकारी यंत्रणा आणि बंदोबस्त सज्ज करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here