*नॅशनल पार्कच्या कडयावरची* *’अमरकोर शाळा’*
परवा भांडुपमध्ये एका शाळेला प्रशिक्षणानिमित्त भेटण्याचा योग आला. वास्तविक पाहता ‘एक मे’ला शाळांना सुट्टी लागली. अनेक शाळा व शिक्षक आपल्या सुट्टीतील नियोजित कामाला लागले.
मात्र ध्येयाने प्रेरित झालेले शिक्षक व संस्थाचालक पुढील वर्षाच्या नियोजनास लागलेले दिसतात. संपूर्ण देशभर शैक्षणिक क्षेत्रात नवीन शैक्षणिक धोरणाची चर्चा आहे, त्याच्या अंमलबजावणीबाबत काम सुरू आहे. आपल्या शाळेतही त्याची अचूक अंमलबजावणी व्हावी आणि आपल्या शाळेत तळागाळातून संघर्ष करून येणारे विद्यार्थी यांचा गुणवत्तापूर्ण विकास व्हावा, हा ध्यास डोळ्यासमोर ठेवून लालबहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमरकोर विद्यालय भांडुप पश्चिम येथील शाळेने या संदर्भात दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती.
ही शाळा सुरू होऊन ४४ वर्षे झाली. अनेक विद्यार्थी उपयोगी उपक्रम ही शाळा राबवते त्याचा दृश्य परिणाम असा झाला की, आजूबाजूला, राज्यभर मराठी शाळा बंद पडत असताना नॅशनल पार्कच्या कडेवर असणारी, झोपड्या व चाळीच्या दाटीवाटीत हजारोचा पट राखून ही शाळा यशस्वीपणे दमदार वाटचाल करते आहे.येथे हजाराच्या वर विद्यार्थी बालवाडी, पहिलीपासून ते दहावीपर्यंत शिक्षण घेत आहेत. स्कॉलरशीप, डॉ. होमी भाभा, बालवैज्ञानिक परीक्षा अशा राज्यस्तरीय परीक्षा बरोबरच कविता, संगीत,प्रश्नमंजुषा, चित्रकला , हस्तलेखन, नृत्य, कथा, विज्ञान प्रदर्शन, स्नेहसंमेलन, कला आणि हस्तकला, योगा असे अनेक उपक्रम ही शाळा राबवते.सुसज्ज संगणक कक्ष, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगीत कक्ष. लाखो रूपये खर्च करून ज्या सुविधा नॅशनल-इंटरनॅशनल शाळा देतात, तशाच सुविधा ही शाळा नाममात्र शुल्क आकारून पुरवते. म्हणूनच ती खंबीरपणे टिकून आहे.
ही शाळा आपले पारंपरिक सण, उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करते. उदा.आषाढी एकादशीची दिंडी, होळी, मराठी राजभाषा दिन या सगळ्यातून एक आपला वेगळेपणा या शाळेने टिकून ठेवलेला आहे.
शाळेत जाताना अगदी दाटीवाटीतून, बोळातून वाट काढत आपणाला जावे लागते.अशा गर्दीतून जाताना वाटते की, अशा बोळामध्ये असणारी शाळा कशी असेल? जेव्हा प्रत्यक्ष शाळा पाहिली तेव्हा मात्र मी स्वतः खूप उत्साही झालो, लाखो रुपये वार्षिक फी असणाऱ्या शाळा मुंबई, महाराष्ट्रभर पसरलेल्या आहेत. त्यापेक्षा तसूभरही कमी नसणारी, अतिशय स्वच्छ, भरपूर सूर्यप्रकाश असणारी ही शाळा पाहून मन ताजेतवाने झाले आणि अशा पर्यावरणीय वातावरणात ही शाळा आहे याचा आनंद मनाला स्पर्शून गेला. शाळेत आल्यानंतर मुलांनी पायऱ्या पायऱ्या मध्ये भिंतीला लागून उभी केलेली बाग, सोबतच भव्य असे क्रीडांगण हे आपले लक्ष वेधून घेते. वेगळया नोंदी असणारे एक रजिस्टर मी या शाळेत पाहिले, ज्यात नोंदी होत्या शाळेमध्ये येणारे विद्यार्थी कोणासोबत राहतात आणि त्यांचे पालक कोण आहेत? या नोंदी पाहून मला धक्काच बसला कारण अनेक विद्यार्थ्यांना आई-वडीलच नाहीत. काहींना आई नाही, काहींना वडील नाहीत, काही मुले सावत्र आईकडे राहतात, काही आजीकडे, काही पाहुण्यांकडे हीच यादी मोठी होती. अशा मुलांना शाळेत आणून, टिकवून ठेवून त्यांचा दहावीचा निकाल सातत्याने १००% लावणे. ही अशक्य वाटणारी गोष्ट या शाळेत होते.
काही दशकापूर्वीच या शाळेने सेमी इंग्रजी सुरू केले, या शाळेत इंग्रजी ही प्रथम भाषा म्हणून शिकवली जाते. आज आपण ‘सीबीएसई पॅटर्न’ची चर्चा करतो, या शाळेने काही दशकापूर्वीच घेतलेला हा निर्णय किती दूरदर्शीपणे घेतला असेल याची जाणीव होते. या सर्व यशाचे श्रेय जाते त्या शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक आणि या सर्वाची प्रेरणा असणारे ज्यांचा प्रवास शिक्षक, मुख्याध्यापक आणि आता संचालक असणारे मा.मारूती म्हात्रे सर यांना, यांच्या अथक, सांघिक कामातून ‘अमरकोर’ उभी राहिली आहे. या सर्वांच्या कर्तृत्वाला आदरपूर्वक नमन..🙏
डाॅ.माधव सूर्यवंशी,
मुख्य समन्वयक,
शिक्षण विकास मंच,
यशवंतराव चव्हाण सेंटर.





















