*बालकांच्या उपचारात पालकांचा विश्वास आणि मानसिक धैर्य महत्त्वाचे :*डॉ. नीलम गोऱ्हे;* *वाढदिवसानिमित्त ज्युपिटरमध्ये मोफत २-डी इको शिबिर*
पुणे, दि. १३ सप्टेंबर २०२६ – शिवसेना नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा रुग्णालय, पुणे आणि ज्युपिटर रुग्णालय, बाणेर यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांसाठी मोफत २-डी इको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK), जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) आणि हृदयस्पर्श उपक्रमाच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात हृदयविकाराची लक्षणे असलेल्या बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.
यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “बालकाला आजाराचे निदान झाल्यावर संपूर्ण कुटुंबाची परीक्षा असते. पालकांनी मानसिक धैर्य टिकवून डॉक्टरांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक बालकांना नवजीवन मिळत आहे. शस्त्रक्रियेचे नाव ऐकून घाबरू नका.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या समन्वयातून गरजू बालकांना दर्जेदार उपचार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला डॉ. चंद्रमणी, डॉ. अभिजित नाईक, डॉ. राहुल सराफ, डॉ. सचिन शिंदे आदी उपस्थित होते.






















