* *मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला मुदतवाढ; आता ३१ ऑगस्टपर्यंत रील्स अपलोड करता येणार* – *मंत्री संजय राठोड*
*मुंबई, दि. २० ऑगस्ट (Maimedia24):* मृद व जलसंवर्धन विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या रील्स स्पर्धेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता स्पर्धकांना ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले रील्स अपलोड करता येणार आहेत, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.
माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन म्हणून २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ साजरा केला जातो. यानिमित्त ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ आणि ‘मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
यापूर्वी या स्पर्धेसाठी १९ ऑगस्टपर्यंत मुदत होती. मात्र, ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत असून, रील्स बनवण्यासाठी वेळ कमी पडत असल्याने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत होती. त्याची दखल घेत सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली आहे.
“माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा” या संदेशावर आधारित रील्स बनवून नागरिक, विद्यार्थी आणि युवक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महा वॉकेथॉनमध्येही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री राठोड यांनी केले आहे.
—
*























