Home संभाजीनगर स्वदेशी एक्स्पो’ची तयारी अंतिम टप्प्यात आज उद्घाटन

स्वदेशी एक्स्पो’ची तयारी अंतिम टप्प्यात आज उद्घाटन

52
0

स्वदेशी एक्स्पो’ची तयारी अंतिम टप्प्यात आज उद्घाटन

केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटन

केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालयाच्यावतीने आयोजन

 

छत्रपती संभाजीनगर, दि. १३ :- केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालयाच्यावतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये १४ ते १६ ऑगस्टदरम्यान सागर रिसॉर्ट, एमआयडीसी येथे आयोजित ‘स्वदेशी एक्स्पो २०२६’ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. देशभरातून ७५ हून अधिक प्रदर्शक यात सहभागी झाले असून नागरिकांसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत आहे, जास्तीत जास्त नागरिकांना या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

या प्रदर्शनाचे उद्घाटन दि.१४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

 

नॅशनल ज्युट बोर्ड, ट्रायफेड यांसारख्या राष्ट्रीय संस्थांचाही या एक्स्पोमध्ये सहभाग असून त्यांचे सहकार्य लाभले आहे. ओडिशाची पट्टाचित्र, राजस्थानची पिचवाई, झारखंडची सोहराई, बिहारची मधुबनी, उत्तराखंडची ऐपण कला तसेच महाराष्ट्राची पैठणी यांसह विविध राज्यांतील पारंपरिक कला व हस्तकला पाहण्यासोबतच त्यांची खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

 

एक्स्पोमध्ये सहभागी झालेल्या प्रदर्शकांपैकी ७५ टक्क्यांहून अधिक महिला उद्योजक व लघुउद्योगांचा समावेश आहे. एक्स्पोदरम्यान फॅशन शोसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

दि. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे या एक्स्पोला भेट देणार असून, त्यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्यांसह देशभरातून आलेल्या कलाकार व कारागिरांचा गौरव करण्यात येणार आहे.

 

तीन दिवस चालणाऱ्या या स्वदेशी हातमाग व हस्तकला प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन स्वदेशी उत्पादनांची खरेदी करावी, पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सनेही एक्स्पोला पाठिंबा दिला असून आगामी दिवाळीनिमित्त भेटवस्तू म्हणून स्वदेशी उत्पादनांची खरेदी करून कारागीर व उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here