*विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी केली पोद्दार रुग्णालयाची पाहणी;*
*आरोग्य सुविधांचा घेतला आढावा*
मुंबई – आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या वरळी येथील आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयाला विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करत वैद्यकीय सुविधा आणि व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेतला.
या पाहणी दौऱ्यात उपसभापती अहिर यांनी रुग्णालयातील आयुर्वेदिक पंचकर्म विभागाला भेट देऊन तेथील अत्याधुनिक उपचार पद्धतींची सविस्तर माहिती घेतली. तसेच, रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची पाहणी करून तेथील सोयी-सुविधांची चाचपणी केली.
त्यानंतर उपसभापतींनी प्रत्यक्ष वॉर्डमध्ये जाऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांशी थेट संवाद साधला व त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचारांबाबत त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
”नागरिकांना सर्वोत्तम, दर्जेदार आणि गुणवत्तेने परिपूर्ण आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. रुग्णांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे,” अशा स्पष्ट सूचना उपसभापती सचिन अहिर यांनी संबंधित रुग्णालयीन प्रशासनाला दिल्या.
यावेळी आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयाचे
वैद्यकीय अधीक्षक /अधिष्ठाता संपदा संत,
विभागप्रमुख दत्ता नरवणकर ,
नगरसेविका वनिता नरवणकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.





















