Home मुंबई *पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेने रुग्णसेवा सदैव तत्पर आणि अधिक सक्षम...

*पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेने रुग्णसेवा सदैव तत्पर आणि अधिक सक्षम ठेवा; उच्च जोखमीच्या परिसरात लक्ष केंद्रित करा*

25
0

*अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला निर्देश*

*आरोग्य संस्थेच्या सुविधांच्या दुरुस्तीची कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करण्यासह रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश*

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेने रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर आणि अधिक सक्षम राहायला हवे. सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशा महत्त्वपूर्ण सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी दिल्या.

जोगेश्वरी (पूर्व) येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयाला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी आज (दिनांक १८ जुलै २०२६) भेट देत आरोग्यविषयक विविध बाबींचा सविस्तर आढावा घेतला.

परिमंडळातील उप आयुक्त तसेच सर्व सहाय्यक आयुक्त यांनी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून प्रत्येक प्रभागातील आरोग्यविषयक प्राधान्यक्रम निश्चित करावेत. त्यानुसार आरोग्यविषयक बाबींचा नियमित आढावा घ्यावा तसेच नागरिकांकडून मिळणाऱ्या अभिप्रायासाठी प्रभावी यंत्रणा विकसित करावी. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एकूण आरोग्यविषयक धोरणाशी सुसंगत असलेल्या नवीन उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी दिल्या.

पावसाळी आजारांच्या प्रतिबंधासाठी विशेष उपाययोजना
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बांधकामस्थळांची पाहणी आणि प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. झोपडपट्टी परिसरावर विशेष लक्ष केंद्रित करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो आदी पावसाळी व साथीच्या आजारांच्या रुग्णांचा शोध घेण्यासोबतच त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि विशेष मोहीम राबवावी. यासाठी उच्च जोखमीच्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश प्राजक्ता
वर्मा-लवंगारे यांनी दिले.

*आरोग्यविषयक उपक्रमांच्या अंमलबजावणीवर नियमित देखरेख*
परिमंडळ-४ मधील सर्व सहायक आयुक्त तसेच आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी आरोग्यविषयक उपक्रमांच्या अंमलबजावणीवर नियमित देखरेख ठेवावी. आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (HMIS), भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठीच्या उपाययोजना, आरोग्य सुविधांच्या ठिकाणी आवश्यक किरकोळ दुरुस्तीची कामे तसेच आरोग्य केंद्रांमधील स्वच्छतेच्या उपक्रमांचा नियमित आढावा घ्यावा. सहायक आयुक्तांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन कामांची पाहणी करावी. उपलब्ध आकडेवारीच्या आधारे निर्णय घेण्याच्या पद्धतीचा अवलंब करावा, असेही निर्देश त्यांनी दिले. सहायक वैद्यकीय अधिकारी, कीटकनाशक अधिकारी आदी आरोग्यविषयक रिक्त पदे विहित प्रक्रियेचे पालन करून शक्य तितक्या लवकर भरण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

*आरोग्य संस्था सुविधांच्या दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य*
विभागातील आरोग्य सुविधांच्या दुरुस्तीची कामे प्राधान्याने आणि जलदगतीने पूर्ण करण्यासाठी रूग्‍णालय पायाभूत सुविधा कक्षाने (HIC) धोरण तयार करावे. विभागाला एकक मानून दुरुस्तीची कामे मिशन मोडवर जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.

परिमंडळ ४ अंतर्गत येणाऱ्या एस. के. पाटील, एम. डब्ल्यू. देसाई आणि सिद्धार्थ रुग्णालयांच्या कामकाजाचा आढावा यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी आढावा घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन रुग्णांना केंद्रस्थानी ठेवत सर्व संबंधितांनी जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम करावे, अशा सूचना प्राजक्ता
वर्मा- लवंगारे यांनी दिल्या.

*उप आयुक्त आणि सहायक आयुक्तांनी रुग्णालयांचा सातत्याने आढावा घ्यावा*
परिमंडळ ४ मधील रुग्णालयाच्या समस्या आणि प्रलंबित बाबींचा आढावा प्राजक्ता
वर्मा-लवंगारे यांनी घेतला. रुग्णालयातील विविध समस्या वेळेत सोडविण्यासाठी उप आयुक्त आणि सहायक आयुक्त यांनी रुग्णालयांना नियमित भेटी देऊन आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी दिले.

यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी जोगेश्वरी (पूर्व) येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयातील आरोग्यविषयक सुविधांची आणि कामकाजाची पाहणी केली.

*परवाने व नियामक कामकाज अधिक नागरिकाभिमुख करा*
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या विविध परवान्यांच्या अनुषंगाने संबंधित विभागांची भूमिका स्पष्ट असावी तसेच सर्व परवान्यांच्या नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे. व्यवसाय सुलभतेच्या दृष्टीने तसेच नागरिकांना सुलभ सेवा मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, परवाने देण्याची ऑनलाइन प्रक्रिया आदी नागरिकाभिमुख यंत्रणांचा अधिकाधिक अवलंब करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

*नागरिक सुविधा केंद्रे अधिक सक्षम करण्यावर भर*
नागरिक सुविधा केंद्र (CFC) हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवांचे नागरिकांशी थेट संपर्काचे महत्त्वाचे माध्यम आहे. त्यामुळे आरोग्यविषयक सर्व नोंदणी प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी नागरिक सुविधा केंद्रे बळकट करावीत. आरोग्य सेवांसाठी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करून देणे, अर्जांचा मागोवा घेण्याची सुविधा, अर्जाच्या नमुन्यांचे प्रमाणीकरण नागरिकांना सहज दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करावी. आरोग्यविषयक सेवांमध्ये मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन पद्धतीने जलदगतीने उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असे निर्देश देण्यात आले.

*दफनभूमींमधील स्वच्छता व देखभालीचा आढावा*
दफनभूमींची स्वच्छता, अतिरिक्त आवश्यक सुविधा तसेच देखभालीशी संबंधित बाबींचा आढावा घेऊन त्यानुसार आवश्यक नियोजन आणि कार्यवाही करावी, अशा सूचनाही यावेळी वर्मा-लवंगारे यांनी यंत्रणेला दिल्या.

यावेळी उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, उप आयुक्त (परिमंडळ ४) भाग्यश्री कापसे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, परिमंडळ ४ मधील सर्व प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त आदींसह आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here