Home उद्योग / शिक्षण वार्ता *ऑलिम्पियाड सुवर्णपदके विजेत्या परम भयवालसोबत ‘विज्ञान कथा दिन’ साजरा*

*ऑलिम्पियाड सुवर्णपदके विजेत्या परम भयवालसोबत ‘विज्ञान कथा दिन’ साजरा*

30
0

आय.सी.एस.ई बोर्डातील इयत्ता दहावीच्या परीक्षेत भारतातून पहिला क्रमांक मिळवणारा, राष्ट्रीय व जागतिक पातळीवरच्या विज्ञान व गणित ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये अनेक सुवर्णपदके मिळवलेला परम भयवाल हा केवळ सतरा वर्षाचा मुलगा, ज्याच्या प्रमुख उपस्थितीत ‘मुंबई मराठी साहित्य संघ’, ‘मराठी विज्ञान परिषद’, चुनाभट्टी आणि ‘आर्यन एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल’, गिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १७ जुलै रोजी मराठी विज्ञान कथा दिन साजरा करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना नागरगोजे यांनी प्रास्ताविक केले. आयर्न एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलचे अध्यक्ष श्री. अमोद उसपकर यांच्या हस्ते पुस्तकभेट आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मराठी विज्ञान साहित्याला समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व लेखक डॉ. जयंत नारळीकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी १९ जुलै रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान कथा दिन’ साजरा केला जातो.
मराठी विज्ञान परिषदेने २०२२ मध्ये या दिनाची सुरुवात केली. मराठी विज्ञान कथा लेखनाला प्रोत्साहन देणे, हा मूळ उद्देश डोळ्यासमोर या विज्ञान दिनाची सुरुवात करण्यात आली. याविषयीची प्राथमिक माहिती मुंबई मराठी साहित्य संघाच्या साहित्यशाखा कार्यवाह प्रा. प्रतिभा सराफ यांनी दिली.
यानिमित्ताने कु. परम भयवाल याने स्वरचित विज्ञान कथा ‘भविष्यवेध ए.आय.’ अतिशय उत्तमरीत्या सादर केली. त्यानंतर त्याने केलेल्या ऑलिंपियाडच्या तयारीपासून ते त्याला मिळालेल्या सुवर्णपदकांसाठीच्या मेहनतीविषयी, अभ्यासाविषयी उत्तम माहिती दिली. इतकेच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांनी ऑलिंपियाडकडे का वळावे, त्याचा आयुष्यात शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी, स्पर्धा परीक्षांसाठी आणि इतर क्षेत्रातील प्रगतीसाठी कसा उपयोग होतो, याविषयीचे सखोल ज्ञान दिले. ऑलिम्पियाडच्या प्रवेशांच्या तारखांपासून ते त्याच्या अभ्यासाची पुस्तके कुठून मिळवायची इथपर्यंत प्रत्येक माहिती देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
मराठी विज्ञान परिषद तर्फे आलेल्या प्रा. माणिक टेंबे यांनी गणिताच्या गमतीजमती प्रत्यक्ष कागदांद्वारे साकारून दाखवल्या तसेच त्या मागचे ज्ञान, कौशल्य आणि शास्त्र याचीशी थोडक्यात ओळख करून दिली.

या कार्यक्रमादरम्यान मुंबई मराठी साहित्य संघाचे मुखपत्र त्रैमासिक *साहित्य* (जुलै- ऑगस्ट- सप्टेंबर) ‘विज्ञान दिन विशेषांकाचे प्रकाशन संपन्न झाले. या अंकाचे अतिशय उत्कृष्ट संपादन श्री. चंद्रशेखर गोखले यांनी केले आहे. या अंकात डॉ. बाळ फोंडके, मेघश्री दळवी, गजानन परब आदी लेखकांसहित दहा विज्ञान लेखकांच्या कथा समाविष्ट केलेल्या आहेत. याप्रसंगी मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनी विज्ञान कथा विशेषांकांच्या काही कथांचा परामर्श घेत अभ्यासपूर्ण विवेचन केले. विद्यार्थ्यांनी या कथा आपल्या पालकांकडून, शिक्षकांकडून समजून घ्यावात, असेही मार्गदर्शन केले.
याप्रसंगी संपादकीय मंडळ सदस्य प्रा. प्रतिभा बिश्वास उपस्थित होत्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन साहित्य शाखेच्या डॉ. मनोज वराडे यांनी उत्तमरीत्या केले. शाळेच्या नियोजनात सर्वश्री राजेंद्र आवारी, अनंत सोलकर सर या शिक्षकांचा विशेष सहभाग होता, तर श्रीमती शोभा बोडके यांनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले. या संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

प्रा. प्रतिभा सराफ
कार्यवाह,
साहित्य शाखा
मुंबई मराठी साहित्य संघ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here