Home पुणे डॅा.कुमार सप्तर्षी यांना आ. नीलम गोर्हे यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

डॅा.कुमार सप्तर्षी यांना आ. नीलम गोर्हे यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

36
0

९८२०३५१२७५ डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीचा जागृत विचारवंत हरपले ; डॉ. नीलम गोऱ्हे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

पुणे, दि. १८ : ज्येष्ठ समाजवादी नेते, युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि पुरोगामी चळवळीतील अग्रणी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाबद्दल शिवसेना नेत्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. या बातमीवर अजूनही विश्वास बसत नाही. महाराष्ट्रातील पुरोगामी, समाजवादी आणि युवक चळवळींना दिशा देणारा एक जागृत विचारवंत आज आपल्यातून निघून गेला आहे.”

“युवक क्रांती दलात काम करत असताना १९७५ ते १९८३ या काळात मला पुण्यात त्यांच्या नेतृत्वाखाली सक्रियपणे काम करण्याची संधी मिळाली. त्यापूर्वीही शिष्यवृत्ती आंदोलन, शंकराचार्यांशी वैचारिक वादविवाद, दलितांच्या मंदिर प्रवेशासाठीचे आंदोलन, मराठवाडा विकास आंदोलन अशा अनेक सामाजिक संघर्षांमध्ये त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी होते. लोकहितासाठीच्या विविध आंदोलनांत सहभाग घेतल्यामुळे त्यांना जवळपास ३५ वेळा अटकही झाली होती.”

त्या पुढे म्हणाल्या, “नंतर ते जनता दलाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतरही त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांत स्वतःला झोकून दिले. २००० नंतर युवक क्रांती दलाला नवसंजीवनी देण्यासाठी त्यांनी पुन्हा पुढाकार घेतला. त्या काळात त्यांनी मला पुन्हा कामासाठी बोलावले होते. आमचे वैचारिक प्रवास पुढे वेगवेगळ्या दिशांना गेले, तरी परस्परांविषयीचा आदर आणि स्नेह कायम राहिला.”

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “डॉ. कुमार सप्तर्षी यांनी महाराष्ट्रात विचारशील, सामाजिक भान असलेली अनेक पिढी घडवली. त्यांच्या ‘सत्याग्रही विचारधारा’ मासिकातही मला लेखन करण्याची संधी मिळाली. त्यांच्या प्रत्येक उपक्रमामागे त्यांचा संपूर्ण परिवार खंबीरपणे उभा होता. त्यांच्या पत्नी उर्मिला सप्तर्षी, बंधू प्रविण आणि चिरंजीव कबीर यांनीही चळवळीच्या कार्यात महत्त्वाचे सहकार्य दिले.”

“डॉ. कुमार सप्तर्षी हे युवक चळवळीसाठी एक संजीवनी होते. त्यांनी दिलेली वैचारिक ऊर्जा, सामाजिक बांधिलकी आणि लोकशाही मूल्यांवरील निष्ठा पुढील पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहील. विचार कधीच मरत नाहीत; व्यक्ती निघून जाते, पण तिची विचारसंपदा समाजाला सतत दिशा देत राहते. डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या जीवनप्रवासाने हेच सिद्ध केले आहे.”

डॉ. गोऱ्हे यांनी युवक क्रांती दलाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि सप्तर्षी परिवाराच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त करत दिवंगत डॉ. कुमार सप्तर्षी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here