Home Trending Now व्यवस्था परिवर्तनापेक्षा माणूस परिवर्तन अधिक महत्त्वाचे…- *सचिन देव*

व्यवस्था परिवर्तनापेक्षा माणूस परिवर्तन अधिक महत्त्वाचे…- *सचिन देव*

92
0

*व्यवस्था परिवर्तनापेक्षा माणूस परिवर्तन अधिक महत्त्वाचे…*
*सचिन देव*

भ्रष्ट तो भ्रष्टच…! मग तो कोणत्याही पक्षाचा, विचारसरणीचा किंवा पदावरील असो. भ्रष्टाचाराला पक्ष, जात किंवा विचारधारेची सीमा नसते; तो समाजाचाच शत्रू असतो.

समाज बदलण्याची सुरुवात व्यवस्था बदलण्यापासून होत नाही, तर स्वतःला बदलण्यापासून होते. माणसाने सर्वप्रथम स्वतःच्या विचारांचे, आचरणाचे आणि चारित्र्याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. त्यानंतर आपल्या सहवासातील प्रत्येक व्यक्तीचा सन्मान राखत, कुटुंबात संस्कार रुजवत आणि पुढे समाजापर्यंत त्या मूल्यांचा विस्तार केला पाहिजे. ‘मी’ पासून ‘आपण’ पर्यंतचा हा प्रवासच खऱ्या परिवर्तनाचा पाया आहे.

इतिहासात व्यवस्था परिवर्तनासाठी अनेक आंदोलने झाली. महात्मा गांधींचे असहकार आंदोलन, दांडी यात्रा आणि भारत छोडो आंदोलन, लोकनायक जयप्रकाश नारायण यांची संपूर्ण क्रांती तसेच अण्णा हजारे यांची भ्रष्टाचारविरोधी चळवळ या सर्वांनी जनतेला जागृत केले आणि परिवर्तनाची आशा निर्माण केली. मात्र काळाने एक गोष्ट स्पष्ट केली ,व्यवस्था किंवा पक्ष बदलल्याने परिवर्तनाची हमी मिळत नाही; *माणसाची वृत्ती बदलली तरच व्यवस्था बदलते.*

याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे *रामराज्य.*

प्रभू श्रीरामांनी राज्याभिषेक समोर असतानाही वडिलांच्या मनातील आज्ञा ओळखून चौदा वर्षांचा वनवास स्वेच्छेने स्वीकारला. त्यांच्यासाठी सत्ता नव्हे, तर कर्तव्य, वचनपूर्ती आणि धर्म सर्वोच्च होते. किष्किंधा जिंकल्यानंतर त्यांनी ते राज्य सुग्रीवाला दिले, तर लंकेवर विजय मिळवूनही ती स्वतःच्या अधिपत्याखाली न ठेवता बिभीषणाकडे सोपवली. “जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी” या मूल्याचा त्यांनी स्वतःच्या आचरणातून आदर्श घालून दिला.

परंतु रामराज्य केवळ फक्त श्रीरामांमुळे आदर्श नव्हते. राम एकच होते; पण त्या राज्यातील प्रत्येक नागरिक आपल्या आचरणात ‘रामत्व’ जगण्याचा प्रयत्न करत होता. म्हणूनच ते राज्य आदर्श ठरले. सत्य, कर्तव्य,आचरण धर्म, प्रामाणिकपणा, संयम, परस्पर आदर आणि समाजहित ही प्रत्येक व्यक्तीची जीवनमूल्ये होती.

संत तुकाराम महाराज म्हणतात

*आपणासारिखे करिती तात्काळ, नाही काळवेळ तयालागी.*

सज्जन माणूस स्वतः जसा आचरण करतो, तसेच इतरांनाही घडविण्याचा प्रयत्न करतो. तो परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासूनच करतो.

आज मात्र अनेकदा चित्र उलटे दिसते. सत्ता, पद, पैसा आणि स्वार्थ यासाठी माणूस कोणत्याही थराला जाण्यास तयार होतो. स्वतःचे खिसे कसे भरतील यासाठी रात्रंदिवस धडपड चालते; पण ह्यात समाज, राष्ट्र आणि कर्तव्य दुय्यम ठरते. म्हणूनच व्यवस्था बदलण्यापेक्षा माणसाच्या मनाचा आणि मूल्यांचा बदल अधिक महत्त्वाचा आहे.

एक समर्पक उदाहरण सांगायचे तर, उंदीर मारण्यासाठी मांजर आणले; पण त्या मांजराने उंदीर मारण्याऐवजी देवघरातील आणि लहान मुलाचे दूधच पिऊन उरलेले सांडून टाकले. म्हणजे समस्या सोडवण्यासाठी आणलेला पर्यायच नवी समस्या निर्माण करू लागला. केवळ चेहरे किंवा पक्ष बदलून समाज बदलत नाही.

यासाठी मुलांना केवळ औपचारिक शिक्षण नव्हे, तर प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, शिस्त, संवेदनशीलता आणि नैतिक मूल्यांचे अनौपचारिक शिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. प्रत्येकाच्या मनात “माझ्या प्रत्येक कृतीचा साक्षीदार परमेश्वर आहे” ही भावना जागृत झाली, तर भ्रष्टाचार, दुराचार आणि अप्रामाणिकपणाला आपोआप आळा बसेल.

रस्ता निश्चितच लांबचा आहे; पण हा प्रवास तोट्याचा नाही. दररोज योग्य दिशेने टाकलेले छोटे-छोटे पाऊलच मोठ्या परिवर्तनाचे कारण ठरते. प्रयत्न, संयम आणि दक्षता हीच त्याची साधने आहेत. कष्ट करायचे, पण इतरांच्या घामावर जगायचे नाही; अधिकार मागायचे, पण कर्तव्य विसरायचे नाही.

कारण व्यवस्था घडवतात ती माणसेच. माणूस बदलला की कुटुंब बदलते, कुटुंब बदलले की समाज बदलतो आणि समाज बदलला की व्यवस्था आपोआप बदलते. म्हणूनच आज व्यवस्था परिवर्तनाची नव्हे, तर प्रत्येकाच्या अंतःकरणात रामत्व जागवणाऱ्या माणूस परिवर्तनाची खरी गरज आहे.

सचिन देव-आध्यात्मिक सामाजिक पत्रकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here