Home जालना / परभणी / बीड / लातूर / हिंगोली / नांदेड / उस्मानाबाद *नांदेडात नाल्यातील साचलेल्या पाण्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू*

*नांदेडात नाल्यातील साचलेल्या पाण्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू*

10
0

नांदेड : नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातील इस्लामपुरा भागातील चार शाळकरी मुलांचा नाल्यातील साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड शहरावर शोककळा पसरली असून मृतांच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश काळजाचा थरकाप उडवणारा आहे.

*नेमकी घटना काय ?*
मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामपुरा भागातील ही मुलं शाळा सुटल्यानंतर घराकडे जात होती. दुपारी १२ च्या सुमारास हारूनबाग परिसरात एका मोठ्या खड्ड्यात पावसाचे किंवा नाल्याचे पाणी साचलेले होते. उन्हाचा तडाखा किंवा खेळण्याच्या ओघात ही मुलं पोहण्याच्या उद्देशाने त्या पाण्यात उतरली. मात्र, खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाणी अतिशय खोल असल्याने चारही मुलांचा गुदमरून मृत्यू झाला.

*काठावर सापडले बूट आणि गणवेश*
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. पाण्याचा काठावर मुलांचे शालेय गणवेश, बूट आणि चपला आढळून आल्या, तेव्हा या दुर्घटनेची भीषणता समोर आली. स्थानिकांनी तातडीने शोधमोहीम राबवून मुलांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. मृत मुलांचे वय ८ ते १८ वर्षांच्या दरम्यान आहे.
मृतांची नावे
महमद अली (१३ वर्षे)
महमद फुरखान (१८ वर्षे)
महमद अदनान (८ वर्षे)
महमद रेहान (११ वर्षे)

*प्रशासनाचा हलगर्जीपणा की कंत्राटदाराची चूक ?*

ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे महानगरपालिकेकडून खासगी कंत्राटदारामार्फत नाल्याचे काम सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच बाजूलाच प्लॉटिंगचेही काम सुरू आहे. हा मोठा खड्डा नेमका कोणी खोदला आणि तो उघडा का ठेवला? तिथे सुरक्षेचे कोणतेही उपाय का केले नव्हते? असे संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या दुर्घटनेला जबाबदार धरून संबंधित कंत्राटदार किंवा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here