लोकप्रतिनिधींमधील सत्तास्पर्धेचा फटका दुष्काळग्रस्तांना बसू नये, डॉ. गोऱ्हे यांची अपेक्षा
दुष्काळ निवारणात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिवसेना पद्धतीने धडा शिकवू : डॉ. नीलम गोऱ्हे
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शिवसेनेने आत्महत्या प्रतिबंधक मदत केंद्र स्थापन करावे
लातूर, दि. ९ ऑक्टोबर : दुष्काळ निवारणाच्या कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिवसेना पद्धतीने धडा शिकवला जाईल, असा इशारा शिवसेना नेत्या, विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिला. लोकप्रतिनिधींमधील सत्तास्पर्धेचा फटका दुष्काळग्रस्तांना बसता कामा नये. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
लातूर येथे आयोजित शिवसेनेच्या दुष्काळ आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाप्रमुखांनी दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत निवेदन सादर केले.
शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यांच्या सूचनेनुसार शिवसैनिकांनी गावपातळीवर उतरून दुष्काळग्रस्तांना मदत करावी आणि शासनाच्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवावा, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ‘शेतकरी आत्महत्या प्रतिबंधक मदत केंद्र’ स्थापन करावे, असे आवाहन त्यांनी केले. आर्थिक संकटातील शेतकऱ्यांशी युवासेना व महिला आघाडीने नियमित संपर्क ठेवावा. प्रशिक्षित समुपदेशकांच्या सहकार्याने त्यांना मानसिक आधार द्यावा आणि शासकीय मदतीसाठी पाठपुरावा करावा. संकटातील शेतकऱ्यांना एकटे पडू देऊ नका, असेही त्यांनी सांगितले.
शासनाच्या दुष्काळविषयक निर्णयांची गावपातळीवर अंमलबजावणी होण्यासाठी पाणी, चारा, रोजगार आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्क सवलतींची गावनिहाय माहिती संकलित करावी. प्रत्येक जबाबदार कार्यकर्त्याकडे दहा गावांची जबाबदारी देऊन प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
चाऱ्याची तीव्र टंचाई असलेल्या गावांमध्ये चारा वितरण अथवा चारा छावण्यांची व्यवस्था करावी. शेतमजुरांसाठी रोजगार हमीची कामे सुरू करावीत आणि लागू शुल्क सवलती न देणाऱ्या शाळा व महाविद्यालयांची माहिती शिक्षण विभागाकडे सादर करावी, असे त्यांनी सांगितले. प्रलंबित पीक विमा, विद्यार्थ्यांना मोफत बस पास आणि दुष्काळी मदतीची क्षेत्रमर्यादा शिथिल करण्याच्या मागण्याही बैठकीत मांडण्यात आल्या.
पात्र पाणीपुरवठा कामांसाठी शासनाच्या परवानगीनुसार आमदार निधीतून मदत करण्याची तयारी डॉ. गोऱ्हे यांनी दर्शविली. ऑक्टोबरअखेरीस पुन्हा प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीस उपनेत्या कला शिंदे, संपर्कप्रमुख रंजना कुलकर्णी, सुनीता मोरे, जिल्हाप्रमुख शिवाजी माने, सचिन दाणे, जयश्री भुतेकर, अर्चना बिरजदार, सुनीता चाळक, बाबुराव शेळके, मोहन दिवटे आदी उपस्थित होते.






















