राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनानिमित्त भायखळा येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या मुख्यालयात आज, मंगळवार दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर आदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच, दि. १४ एप्रिल २०२६ ते २० एप्रिल २०२६ दरम्यान अग्निशमन सेवा सप्ताह साजरा केला जाणार आहे. या सप्ताहाचा शुभारंभ देखील करण्यात येणार आहे.
मुंबई गोदीमध्ये दि. १४ एप्रिल १९४४ रोजी एस. एस. फोर्ट स्टिकीन या बोटीमध्ये महाप्रचंड स्फोट होऊन झालेल्या अग्निप्रलयात मुंबई अग्निशमन दलाचे ६६ बहादूर जवान व अधिकारी यांनी प्राणाहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ १४ एप्रिल हा दिवस ‘अग्निशमन सेवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यासह अग्निशमन सेवा सप्ताहात मुंबईत विविध ठिकाणी अग्निप्रतिबंध व अग्निसुरक्षा विषयक प्रात्यक्षिके, व्याख्याने, प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये अग्निसुरक्षा रॅली, अग्निशमन उपकरणांचे प्रदर्शन, अग्निसुरक्षेविषयी जनजागृती संबंधी भित्तीपत्रकांचे वाटप, व्याख्याने व प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे.
*अग्निसुरक्षा रॅलीचे आयोजन*
अग्निशमन दलाच्या भायखळा, वडाळा, मरोळ, मानखुर्द, बोरिवली व विक्रोळी या परिमंडळामध्ये अग्निसुरक्षाविषयक जनजागृती करण्यासाठी ‘फायर रॅली’ काढण्यात येणार आहेत. तसेच प्रात्यक्षिके (डेमॉन्स्ट्रेशन) आणि कवायत (मॉक ड्रील) सादर होणार आहेत. रुग्णालये, व्यापारी संकुल इत्यादी ठिकाणी आग लागल्यानंतर कोणती खबरदारी घ्यावी याविषयी अग्निशमन दलाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
*अग्निसुरक्षा विषयक भित्तीपत्रकांचे वाटप*
मुंबईतील उंच इमारती, निवासी चाळी, व्यापारी संकुले यांसारख्या ठिकाणी भित्तीपत्रके लावून अग्निसुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. आग लागल्यास किंवा गॅस गळतीसारख्या घटनांमध्ये नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी याविषयी माहिती दिली जाणार आहे.
*व्याख्याने व प्रात्यक्षिके*
मुंबईतील ३५ अग्निशमन केंद्रांतील अधिकारी व कर्मचारी विविध शाळा, रहिवासी सोसायट्या इत्यादी एकूण १२५ ठिकाणी अग्निसुरक्षेवरील व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. यामध्ये प्राथमिक अवस्थेतील आग विझविण्याच्या पद्धती, अग्निरोधक उपकरणांचा वापर, स्वयंपाकघरातील गॅस गळतीचे उपाय यांची माहिती देण्यात येणार आहे.
*शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी वार्षिक अग्निकवायत अंतिम फेरी*
शनिवार दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता भायखळा येथील प्रादेशिक समादेश केंद्रात वार्षिक अग्निकवायत स्पर्धेची अंतिम फेरी आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून म्हणून मुंबईच्या महापौर रितू तावडे तसेच स्थानिक नगरसेवक, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली.
**





















