*पर्यटनाच्या सर्वसमावेशक ब्रँडिंगसाठी राज्य शासनाचा निर्धार*
मुंबई, दि. १५ : महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला जागतिक स्तरावर अग्रस्थानी नेण्यासाठी सर्वंकष आणि प्रभावी ब्रँडिंग व मार्केटिंग धोरण राबविण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून, “जागतिक पर्यटनात महाराष्ट्र अग्रेसर हवा,” असे प्रतिपादन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे पर्यटन विभागाच्या मीडिया व ब्रँडिंग प्लॅन संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, उपसचिव संतोष रोकडे, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आणि सहसंचालक संतोष जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री देसाई यांनी सांगितले की, महाराष्ट्रात ऐतिहासिक गड-किल्ले, जागतिक दर्जाचे समुद्रकिनारे, समृद्ध जैवविविधता, धार्मिक तीर्थक्षेत्रे, तसेच वैविध्यपूर्ण लोकसंस्कृती आणि खाद्यसंस्कृती यांचा अद्वितीय संगम आहे. या सर्व घटकांचे आधुनिक डिजिटल माध्यमांतून प्रभावी सादरीकरण करून देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या पर्यटनाची ओळख अधिक भक्कम करण्यासाठी टीव्ही, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि इतर प्रसारमाध्यमांचा समन्वय साधून व्यापक प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे. सन २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येणारा ब्रँडिंग आणि मार्केटिंग प्लॅन हा राज्य, आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनवृद्धीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
तसेच, पर्यटन क्षेत्रातील नवकल्पना, शाश्वत पर्यटन, ग्रामीण पर्यटन आणि अनुभवाधारित उपक्रमांना चालना देत महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर एक मजबूत ब्रँड म्हणून स्थापित करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मंत्री देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला नवी गती देत, राज्याला जागतिक पर्यटन क्षेत्रात अग्रस्थानी नेण्याच्या दिशेने हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.
००००






















