Home मुंबई *सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षाची बालकांचा मोफत व सक्तिच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम...

*सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षाची बालकांचा मोफत व सक्तिच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रियासाठी सोडत जाहीर*

102
0

*बृहन्मुंबई परीक्षेत्रातील ३२५ शाळांसाठी ४९४१ जागांसाठी विद्यार्थ्यांची निवड*

*दि. २० एप्रिल २०२६ पर्यंत कागदपत्रांची तपासणी करुन आपल्या बालकाचा ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्याचे मुंबई मनपा शिक्षण विभागाचे आवाहन*

बालकांचा मोफत व सक्तिच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. दि. १० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी पोर्टलवर निवड यादी व प्रतिक्षा यादी घोषित करण्यात आली. निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या भ्रमणध्वनीवर लघू संदेश (एसएमएस) पाठविण्यात आले आहेत. पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर अर्ज निहाय रिपोर्ट यावर (Application wise report) आपल्या बालकाचा अर्ज क्र. टाकून अर्जाची स्थिती पहावी व वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले आहे.

आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रक्रियेअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रकिया दि. १७ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक ३१ मार्च २०२६ या कालावधीपर्यत महाराष्ट्र शासनाच्या
https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. बृहन्मुंबई परिक्षेत्रातील महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळासाठी २५२ शाळांमध्ये ४५५८ जागा आहेत आणि इतर मंडळासाठी ७३ शाळांमध्ये १४६५ जागा आहेत. अशा एकूण ३२५ शाळांमधील ६०२३ राखीव जागांसाठी एकूण १०३८३ ऑनलाईन पात्र अर्ज प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या अर्जासाठी ऑनलाईन सोडत (लॉटरी) सोमवार दि. ६ एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे येथे काढण्यात आली. दि. ७ एप्रिल २०२६ ते दिनांक १० एप्रिल २०२६ पर्यंत शासनाच्या एनआयसी या कंपनीमार्फत ऑनलाईन तांत्रिक प्रक्रिया सुरू होती. दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी पोर्टलवर निवड यादी व प्रतिक्षा यादी घोषित करण्यात आली.

लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी मंजुरी व वाटप पत्र (Allotment letter) ची प्रिंट काढावी, सदर पत्र व प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (अर्ज करतेवेळी अपलोड केलेले) घेवून विहित मुदतीत संबंधित पडताळणी समिती केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून दिनांक २० एप्रिल २०२६ या कालावधीमध्ये कागदपत्रांची तपासणी करुन आपल्या बालकाचा ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्याच्या प्रवेश पत्राची शाळेसाठीची प्रत (school copy) घेऊन शाळेमध्ये जाऊन शाळास्तरावर प्रवेशाबाबतची कार्यवाही पूर्ण करावी.

शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ या वर्षाकरीता आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता दिनांक २० एप्रिल २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी पडताळणी समिती व शाळेशी संपर्क साधून दिनांक २० एप्रिल २०२६ पूर्वी आपल्या पाल्याचा ऑनलाईन प्रवेश निश्चित केला नाही तर यासाठी सर्वस्वी पालक जबाबदार राहतील. पालकांनी आपल्या बालकाचा प्रवेश विहित वेळेत ऑनलाईन निश्चित केला नाही तर त्या बालकाचे नाव निवड यादीतून बाद होईल व प्रतिक्षा यादीतील बालकाचा प्रवेश निश्चित केला जाईल, याची पालकांनी नोंद घ्यावी.

प्रवेशाबाबत अडचण उद्भवल्यास किंवा शाळेने सहकार्य न केल्यास एस.एस.सी वोर्डाच्या शाळांसाठी बृहन्मुंबई महानगर पालिका उपशिक्षणाधिकारी (खासगी प्राथ, शाळा विभाग) यांचे कार्यालय, करीरोड मुंबई येथील संबधित विभाग निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा. तसेच इतर बोर्डाच्या शाळांसाठी शिक्षण निरीक्षक, महाराष्ट्र शासन (उत्तर, दक्षिण व पश्चिम) आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय, चर्नीरोड येथे संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here