*- मुंबईकरांना सणाच्या दिवशी घरपोच मिळणार स्वादिष्ट पुरणपोळी*
बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून गुढीपाडवा सणानिमित्त ‘पुरणपोळी महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. मुंबईकर ऑनलाइन माध्यमातून मागणी नोंदवून या पुरणपोळ्या घेऊ शकतात. या उपक्रमातून मुंबईकरांना पारंपरिक घरगुती चवीच्या पुरणपोळ्या उपलब्ध करून देतानाच महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही चालना देण्याचा उद्देश आहे.
मुंबईतील होतकरू आणि कलाकौशल्य असणाऱ्या महिलांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम योजना राबविण्यात येतात. याच माध्यमातून महिला बचत गट तयार करण्यात आले आहेत. या बचत गटांना अर्थसहाय्य करून त्यांना आर्थिक सक्षम करण्यात आले आहे. या बचत गटातील महिला विविध प्रकारच्या सौंदर्य वस्तू, आभूषणे, बॅग, पर्स, आकाश कंदील, पणत्या, मेणबत्ती अशा प्रकारच्या छोट्या व्यवसायातून आर्थिक स्वावलंबी झाल्या आहेत. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
अनेक महिला बचत गट रुचकर आणि स्वादिष्ट पुरणपोळी देखील तयार करतात. विविध सण-उत्सव आले की, या महिला बचत गटांमार्फत पुरणपोळी माफक दरात पुरविली जाते. याच अनुषंगाने आता देखील गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांनी ‘पुरणपोळी महोत्सव’ आयोजित केला आहे. या महोत्सवांतर्गत स्थानिक महिला बचत गटांकडून सर्व निकष पाळून तयार करण्यात आलेल्या मऊ, लुसलुशीत आणि स्वादिष्ट पारंपरिक पुरणपोळ्या ऑनलाईन नोंदणी आधारे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या पुरणपोळ्या ३ ते १० च्या सोयीस्कर पॅकमध्ये उपलब्ध असतील. त्यांची किंमत १५० रुपयांपासून सुरू होणार असल्याने मुंबईकरांना घरगुती चवीचा आनंद माफक दरात घेता येणार आहे. विशेष म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुंबईतील विविध भागांमध्ये कार्यरत असलेल्या महिला बचत गटांकडून या पुरणपोळ्यांची घरपोच (Home Delivery) सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना सणाच्या दिवशी पारंपरिक पुरणपोळीचा आस्वाद सहज घेता येणार आहे.
*गुरुवार, दि. १९ मार्च २०२६ रोजी घरपोच मिळणार पुरणपोळी*
पुरणपोळी महोत्सवामुळे स्थानिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आर्थिक सक्षमीकरणाला हातभार लागणार आहे. मुंबईकरांनी या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद देत https://shgeshop.com या संकेतस्थळावरून आपली मागणी नोंदवावी. मागणी नोंदविलेल्या मुंबईकरांना गुरुवार, दि. १९ मार्च २०२६ रोजी घरपोच पुरणपोळी मिळेल, अशी माहिती संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली आहे.
***



















