Home मुंबई *गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेचा मुंबईसह महाराष्ट्रातील शुभारंभ, सार्वजनिक...

*गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेचा मुंबईसह महाराष्ट्रातील शुभारंभ, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न*

48
0

*एच.पी.व्ही. लस देऊन मुलींचे भविष्य गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून सुरक्षित करावे – महापौर रितू तावडे यांचे मुंबईकरांना आवाहन*

*मुंबईत, पहिल्या टप्प्यात महानगरपालिका शाळांमधील एकूण २४ हजार ९३६ लाभार्थी मुलींचा लसीकरण मोहिमेत समावेश*

*आगामी आठवड्यापासून ‘यु-विन’ (U-WIN) पोर्टलवर नोंदणी करता येणार*

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग भविष्यात होऊ नये याकरीता सद्यस्थितीत १४ वर्षे पुर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पुर्ण न झालेल्या वयाच्या मुलींना एच. पी. व्ही. लस देण्यासाठीच्या देशव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ अजमेर (राजस्थान) येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार दि. २८ फेब्रुवारीला सकाळी करण्यात आला.

या राष्ट्रीय शुभारंभानंतर सदर मोहिमेचा मुंबईसह महाराष्ट्रातील शुभारंभ राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि उप महापौर संजय घाडी यांच्या हस्ते शनिवार दि. २८ फेब्रुवारी रोजी करण्यात आला. एचपीव्ही लसीकरण राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात दृकश्राव्य प्रणालीद्वारे हे सर्व मान्यवर सहभागी झाले.

मुंबई सेंट्रल स्थित आणि बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय येथे हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी १४ वर्ष पूर्ण झालेल्या ५ लाभार्थ्यांना एचपीव्ही लस देवून मुंबईसह महाराष्ट्र स्तरीय मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

पहिल्या टप्प्यात बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधील लाभार्थी मुलींचे तर पुढील टप्प्यात इतर खासगी व अनुदानित शाळा येथील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल.

“गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग जागतिक स्तरावर आणि देशात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. परंतु भविष्यात संभाव्य गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा लसीकरण करुन टाळणे शक्य आहे. मुंबईकर नागरिकांनी आपल्या मुलींना या मोहिमेदरम्यान एच. पी. व्ही. लस देऊन मुलींचे भविष्य हे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून सुरक्षित करावे.”असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी या कार्यक्रमात केले. ही लस संपूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे पालकांनी चिंता करू नये, असे आवाहनही त्यांनी या निमित्ताने केले.

याप्रसंगी नगरसेवक रोहिदास लोखंडे, नगरसेविका अमरीन अब्राहनी, राज्य आरोग्य विभागाचे सचिव ई. रविंद्रन, राज्य आरोग्य संचालनालयाच्या आयुक्त डॉ. (श्रीमती) कादंबरी बलकवडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, नायर दंत रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. माला दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते.

लसीकरण मोहीम पुढील ३ महिने सलग सुरू राहील आणि त्यानंतर ती नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग होईल. सदर लसीच्या सुविधा महानगरपालिकेतील २३६ आरोग्य केंद्र, २७ प्रसूतिगृहे, १६ सर्वसाधारण रुग्णालय व ५ वैद्यकीय महाविद्यालय अशा एकूण २८४ आरोग्य संस्था येथे देण्यात येईल.

*लसीकरणाचे टप्पे*
१४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पुर्ण न झालेल्या मुली हा निकष लक्षात घेता, मुंबईमधील एकूण अंदाजित लाभार्थी १,३०,००० इतके आहेत. पहिल्या टप्प्यात महानगरपालिका शाळांमधील २४ हजार ९३६ लाभार्थी मुलींचा लसीकरण मोहिमेत समावेश करण्यात येईल. इतर खासगी व अनुदानित शाळा येथील लाभार्थ्यांचे लसीकरण राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार पुढील टप्प्यात करण्यात येईल.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग जागतिक स्तरावर आणि देशात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. हा कर्करोग हयुमन पॅपिलोमा व्हायरस (Human Papiloma Virus) या विषाणूमुळे होतो आणि हा एकमेव कर्करोग आहे, जो लसीकरणाने टाळता येऊ शकतो.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा लसीकरणाने टाळता येणारा कर्करोग आहे. भारतीय महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी हा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. सन २०२२ मध्ये भारतामधील कर्करोगाचा प्रादुर्भाव १ लाख महिलांमागे १७.७ टक्के इतका होता. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एचपीव्ही (HPV) लस ही राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्याची केंद्र शासनास शिफारस केली.

लसीकरण मोहिमेअंतर्गत लाभार्थी मुलींना ‘गार्डसिल-4’ (Gardasil-4) या एचपीव्ही लसीची एक मात्रा (०.५ मिली) डाव्या दंडावर स्नायूमध्ये दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर त्यांच्या डाव्या तर्जनीच्या नखावर ( left index figure) मार्कर पेनने मार्किंग करण्यात येणार आहे. हे लसीकरण ऐच्छिक असून त्यासाठी पालकांच्या संमतीची आवश्यकता आहे.

प्रतिकूल घटना व्यवस्थापन (AEFI) करिता प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असतात. आवश्यकता भासल्यास नजीकच्या शासकीय / महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय / राज्य रुग्णालयामधे संबंधित व्यवस्था करण्यात आली आहे.

*लसीकरणाची नोंदणी*

• सर्व लाभार्थ्यांची एचपीव्ही लसीकरणासाठीची नोंदणी आणि प्रमाणपत्र वाटप हे केंद्र शासनाकडील ‘यु-विन’ (U-WIN) पोर्टलद्वारे पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केले जाणार आहे.

*लसीकरणानंतरची संभाव्य लक्षणे*
एचपीव्ही लस दिल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा इंजेक्शनच्या ठिकाणी सूज येऊ शकते, जी २-३ दिवसात बरी होते. प्रत्येक केंद्रावर त्वरित उपचारासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत. तथापि, गंभीर आजार असलेल्या मुली, ज्यांना यीस्टची (Yeast) ॲलर्जी आहे किंवा ज्या गर्भवती आहेत, त्यांनी ही लस देण्यात येणार नाही.

*मोहिमेसाठी यंत्रणेची पुर्वतयारी*

• या मोहिमेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेस सद्यस्थितीत एचपीव्ही लसीच्या २० हजार १६० मात्रा प्राप्त झाल्या आहेत.
• ही मोहीम बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महानगरपालिकास्तरीय अधिकारी, २६२ वैद्यकीय अधिकारी, १००८ परिचारिका , ४४२८ आशा सेविका व आरोग्य स्वयंसेविका यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
• सदर मोहीम ही शालेय शिक्षण विभाग, महिला व बाल विकास व इतर शासकीय विभागाच्या समन्वयाने महानगरपालिका स्तरावर राबविण्यात येईल.

मुंबईतील १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना या मोहिमेदरम्यान एच.पी.व्ही. लस देऊन तिचे भविष्य गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून सुरक्षित करावे.” असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे संबंधित पालकांना करण्यात येत आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here