• २६, २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी विश्व मराठी संमेलनाचे आयोजन
• स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांची घोषणा
• साहित्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यक भालचंद्र नेमाडे यांना
• विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना
मुंबई,दि.१७ : चौथे विश्व मराठी संमेलन यावर्षी नाशिकमध्ये होत असून, हे संमेलन २६, २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. या चार दिवसांच्या कालावधीत आणि मराठी भाषा दिना निमित्ताने २०२५ चे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना, श्री.पु.भागवत पुरस्कार नांदेड येथील निर्मल प्रकाशन संस्थेस, डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ.दिलीप धोंगडे आणि आपटे वाचन मंदिर, कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कार विनोद नारायण कुलकर्णी आणि कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद याच बरोबर २०२४ चे स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत म्हणाले, २०२५ यावर्षीचा साहित्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यक भालचंद्र नेमाडे यांना देण्यात येणार असून या पुरस्काराचे स्वरुप मानपत्र, सन्मानचिन्ह आणि दहा लाख रुपये असे आहे. तसेच कलारत्न पुरस्कार संगीतकार अजय आणि अतुल गोगावले यांना देणात येणार असून या पुरस्काराचे स्वरुप मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पाच लाख रुपये असे आहे. यावर्षीपासून विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार सुरू करण्यात येत तो आंळदी येथील शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा कूरेकर यांना देण्यात येणार असून या पुरस्काराचे स्वरुप मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पाच लाख रुपये असे आहे. तर डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ.दिलीप धोंगडे आणि आपटे वाचन मंदिर यांना, तसेच कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कार विनोद नारायण कुलकर्णी आणि कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद यांना जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराचे स्वरुप मानपत्र, सन्मानचिन्ह आणि दोन लाख रुपये असे आहे. नाशिक येथे १५ फेब्रुवारी २०२६ रोजी पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत साहित्यक आणि संस्थांची निवड करण्यात आली. २०२४ चे देण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार प्रकारातील प्रोढ वाड्मय (२२), बाल वाड्मय (६), प्रथम प्रकाशन (६), सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार (१) अशे एकूण ३५ पुरस्कार देण्यात येणार असल्याचे मंत्री डॉ.सामंत यांनी यावेळी सांगितले.
नाशिक येथे चार दिवस होत असलेले विश्व मराठी संमेलनाचे निमंत्रक आणि मराठी भाषा मंत्री म्हणून संमेलनास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करून मंत्री डॉ.सामंत म्हणाले, चौथ्या विश्व मराठी संमेलनात मराठीच्या उन्नतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याच्यामध्ये मराठी भाषेचा संगीत क्षेत्रामधला ब्रँड अम्बॅसिडर, मराठी भाषेचा लेखक म्हणून ब्रँड अम्बॅसिडर, अशी नवीन संकल्पना आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच पाच कोटी रुपयांची इमारत लंडन येथे खरेदी केली असून त्याठिकाणी पुढच्या दोन महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने वैश्विक मराठी भाषा केंद्र सुरू करणार असल्याचे मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.



















