मुंबई येथे होणार मुलीची दीक्षा!
*लेकीच्या वडिलांचा आक्रोश, केला तीव्र विरोध!*
धुळे
केवळ आईच्या आग्रहामुळे मुलीचा दीक्षा समारंभ होणार असून मुलगी अल्पवयीन असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
विशेष म्हणजे मुलीच्या दीक्षा घेण्याला तिच्या वडिलांचा सक्त विरोध असल्याने त्यांनी संबंधित गुरुमहाराजांना कायदेशीर नोटीस पाठवून हा दीक्षा सोहळा थांबवण्याची मागणी केली आहे.
धुळे शहरातील गल्ली नं. ६, जुन्या धुळ्यात राहणारे मनोज सुवालाल कांकरिया यांनी ऍड. राहुल शिकारे यांच्या माध्यमातून प्रशांत मूर्ती गच्छाधिपती पूज्य आचार्य श्री राजेंद्रसुरीश्वरजी यांना नोटीस द्वारे आपला विरोध दर्शवला आहे. या नोटिशीत म्हटल्याप्रमाणे, मनोज कांकरिया यांचा विवाह सोनाली यांच्या सोबत झाला होता. मात्र, त्यांचे आपापसात पटत नसल्याने १३ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांच्यात कौटुंबिक न्यायालयाद्वारे रीतसर घटस्फोट झाला आहे. या दाम्पत्यास रिटा, जागृती व प्राप्ती अश्या तीन मुली असून पैकी जागृती आणि प्राप्तीचा ताबा न्यायालयाच्या आदेशाने वडील मनोज कांकरिया यांच्याकडे आलाय. मात्र, या पुर्वीच रिटा या मोठ्या कन्येने दीक्षा घेतली (साध्वी रत्नांगधराश्रीजी दीक्षा पश्चात नांव) असून द्वितीय कन्या जागृतीचे लग्न झाले आहे. तिसरी मुलगी प्राप्ती हिचा जन्म १३ जून २००८ रोजी झाला असल्याने सद्यस्थितीत ती कायद्याने सज्ञान नाही असे असतांना तिच्या आईच्या आग्रहास्तव तिचा दीक्षासोहळा आचार्य मुक्तिवल्लभसूरी यांच्या आज्ञानुसार मुंबई येथे येत्या १४ मार्च रोजी होणार असल्याचे वडील मनोज कांकरिया यांना समजले. वास्तविक जैन समाजाच्या रुढी व परंपरेनुसार वडिलांची लेखी परवानगी घेतल्यानंतर व गुरुभगवंत यांच्यासमोर प्रत्यक्ष हजर राहून सही करुन लेखी परवानगी दिल्यानंतरच दीक्षा प्रदान करता येते, असा नियम आहे परंतु या प्रकरणात प्राप्तीच्या दीक्षा घेण्याला तिचे जन्मदाते वडील मनोज कांकरिया यांचा स्पष्ट विरोध आहे. मुलगी अल्पवयीन आहे, तिला याबाबत समज नाही. शिवाय तिने दीक्षा घ्यावी अशी वडिलांची अजिबात इच्छा नाही. असे असतांना वडिलांच्या परवानगीशिवाय तसेच आचार्य मुक्तिवल्लभ यांच्या हट्टापायी दीक्षा प्रदान करणे हे चुकीचे व बेकायदेशीर असल्याचे कांकरिया यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे आम्हाला समजलेल्या माहितीनुसार मुलगी प्राप्ती हिचा येत्या १४ मार्च २०२६ रोजी दीक्षा प्रदान करण्याचा निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा त्यानंतरही भविष्यात कधीही तिला दीक्षा प्रदान करु नये .” अशी मागणी मनोज कांकरिया यांनी केली आहे.
मागील चातुर्मास संपन्न करुन संबंधित आचार्य महाराजांचे वास्तव्य रॉयल पॅलेस, गोरेगांव (मुंबई) येथे असून त्यांना समक्ष भेटून आपले म्हणणे मांडले असता ते दीक्षा देण्यावर ठाम असल्याने कांकरिया यांना कायदेशीर मार्ग स्वीकारावा लागला.
दीक्षा देण्याचे रद्द केल्याचे आपल्याला लेखी स्वरुपात कळविण्यात यावे तसेच आपल्यात व आमच्यात वाद निर्माण होणार नाही याचीही काळजी घ्यावी.”असे
कांकरिया यांनी गुरुमहाराजांना पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.




















