Home धुळे / नंदुरबार / जळगाव / अहिल्यानगर ‘भारत : द इटर्नल’मधून चिरंतन भारताचा वैचारिक प्रवास उलगडणार!

‘भारत : द इटर्नल’मधून चिरंतन भारताचा वैचारिक प्रवास उलगडणार!

30
0

‘भारत : द इटर्नल’मधून चिरंतन भारताचा वैचारिक प्रवास उलगडणार!
युवा साहित्यिक स्वप्नील खामकर यांच्या सहाव्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन
संस्कृतीपासून मानवतेपर्यंत… विचारविश्‍वाचा वेध!
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय संस्कृती, विचारपरंपरा, तत्त्वज्ञान आणि मानवतेच्या सार्वत्रिक दृष्टिकोनाचा व्यापक वेध घेणारे युवा साहित्यिक तथा उद्योजक स्वप्नील खामकर यांच्या ‘भारत : द इटर्नल’ या सहाव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
रविदासीया फाऊंडेशन (मुंबई) यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार संग्राम जगताप आणि आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभ्युदय को-ऑप. बँकेचे माजी अध्यक्ष संदीप घनदाट, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर आणि युवा नेते अमन आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमी, विचारवंत आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रविदासीया फाऊंडेशनचे संस्थापक संजय खामकर आणि प्रदेशाध्यक्ष सुभाष मराठे यांनी केले आहे.
‘भारत : द इटर्नल’ या पुस्तकातून भारताकडे केवळ भौगोलिक राष्ट्र किंवा प्राचीन संस्कृती म्हणून न पाहता, हजारो वर्षांची वैचारिक, आध्यात्मिक आणि मानवी परंपरा असलेली चिरंतन सभ्यता म्हणून पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारतीय विचारांमधील मानवतावाद, सार्वत्रिकता, अहिंसा, वेदान्ताचा व्यापक दृष्टिकोन, जागतिक शांतता आणि मानवएकतेची संकल्पना यांचा पुस्तकात अभ्यासपूर्ण वेध घेण्यात आला आहे. भारताच्या ज्ञानपरंपरेने जगाला दिलेल्या विचारांचा आधुनिक जगाशी असलेला संबंध, भारतीय तत्त्वज्ञानातील मानवकेंद्री दृष्टिकोन आणि भविष्यातील जागतिक समाजासाठी भारतीय विचारांचे महत्त्व यावरही पुस्तकातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
भारताच्या भूतकाळाचा केवळ गौरव करण्याऐवजी, चिरंतन भारतीय विचारपरंपरेतून वर्तमान आणि भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. त्यामुळे हे पुस्तक भारताच्या सभ्यताविषयक आणि वैचारिक प्रवासाचा व्यापक पट उलगडणारे ठरणार आहे.
‘भारत : द इटर्नल’ हे स्वप्नील खामकर यांचे सहावे प्रकाशित पुस्तक आहे. यापूर्वी त्यांची ‘8 : द गेम इज ऑन’, ‘द सीईओ ऑफ द माइंड’, ‘झिरो टू लॉन्च’, ‘लोकनेते सितारामजी घनदाट (जिओग्राफी)’ आणि ‘द बोरिंग रेव्होल्यूशन’ ही पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लेखनासोबतच स्वप्नील खामकर हे उद्योजक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या लेखनातून वैयक्तिक विकास, विचारशक्ती, उद्योजकता, समाज आणि भारताच्या व्यापक वैचारिक प्रवाहाचा विविध अंगांनी वेध घेण्यात आला आहे.
एप्रिल 2025 मध्ये स्वप्नील खामकर यांना लंडन येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत शासकीय अधिकारी, तज्ज्ञ, मान्यवर आणि लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. खामकर यांचा सहभाग त्यांच्या वैचारिक व सार्वजनिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला. युवा साहित्यिक स्वप्नील खामकर हे महाराष्ट्रातील दुसरे पारंपरिक पद्धतीने प्रकाशित झालेले लेखक असल्याचे नमूद केले जाते. ‘भारत : द इटर्नल’च्या प्रकाशनामुळे त्यांच्या लेखनप्रवासातील आणखी एक महत्त्वपूर्ण अध्याय सुरू होणार असून, भारतीय विचारपरंपरा, संस्कृती आणि समकालीन भारतावरील वैचारिक लेखनाचा यामध्ये समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here