मुळा नदीतील मासेमृत्यूची संयुक्त वैज्ञानिक चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन
पुणे, दि. ११ सप्टेंबर : बालेवाडी-बाणेर परिसरातील मुळा नदीत मोठ्या प्रमाणावर झालेल्या मासेमृत्यूची संयुक्त वैज्ञानिक चौकशी करून प्रदूषणाचे स्रोत तातडीने बंद करावेत, अशी मागणी शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुळा नदीचे पाणी काळवंडलेले, दुर्गंधीयुक्त आणि काही ठिकाणी फेसाळ झाल्याचे निदर्शनास आले आहे. हिंजवडी, सूस व महाळुंगे परिसरातून येणाऱ्या ओढे-नाल्यांमधून प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि रसायनमिश्रित पाणी नदीत मिसळत असल्याच्या तक्रारी आहेत. फुटलेल्या मलवाहिन्या, नदीत टाकण्यात येणारा कचरा आणि अडलेल्या प्रवाहामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, पुण्यात निर्माण होणाऱ्या सुमारे ९८० एमएलडी सांडपाण्यापैकी जवळपास ५०० एमएलडी सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडले जात असल्याची नोंद प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली होती. यासंदर्भात कालबद्ध निर्देश देण्यात आले असतानाही नदीप्रदूषणाच्या घटना वारंवार घडत असल्याने त्यांच्या अंमलबजावणीचे स्वतंत्र परीक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली.
माशांचा मृत्यू रासायनिक विषबाधेमुळे, सांडपाण्यामुळे पाण्यातील प्राणवायू कमी झाल्यामुळे अथवा अन्य कारणाने झाला, हे निश्चित करण्यासाठी पाणी, गाळ व मृत माशांचे नमुने मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासावेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयाने प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, जलसंपदा, आरोग्य आणि मत्स्यव्यवसाय विभागांचे संयुक्त पथक स्थापन करावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
परिसरातील उद्योग, हॉटेल, व्यावसायिक आस्थापने आणि मोठ्या गृहनिर्माण संस्थांमधील ईटीपी व एसटीपी प्रकल्प मंजूर क्षमतेनुसार सुरू आहेत का, याची प्रदूषण नियंत्रण मंडळाने अचानक तपासणी करावी. प्रकल्प बंद ठेवणाऱ्या किंवा बायपासद्वारे अशुद्ध सांडपाणी नदीत सोडणाऱ्या आस्थापनांची परवानगी निलंबित करून पर्यावरणीय नुकसानभरपाईसह कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.
तसेच फुटलेल्या मलवाहिन्या तातडीने दुरुस्त करून मृत मासे व साचलेला कचरा शास्त्रीय पद्धतीने हटवावा. या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल ७२ तासांत आणि प्रयोगशाळेच्या निष्कर्षांसह अंतिम कृती अहवाल सात दिवसांत सार्वजनिक करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना द्यावेत, अशी मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे.





















