*टेहरे समता विद्यालयात २८ लाख ५५ हजारांचा अपहार; संचालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, शिक्षक भरतीच्या नावावर ९ वर्षे वेठबिगारीचा धक्कादायक प्रकार!*
सोयगाव :शिक्षक भरतीच्या नावावर फसवणूक व वेठबिगारी:
*मालेगाव (टेहरे) | प्रतिनिधी | MAI MEDIA 24*
मालेगाव तालुक्यातील टेहरे येथील सर्वांगीण विकास मंडळ संचलित समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. *दैनिक देशदूत, लोकमत, सकाळ व नवराष्ट्र* या चारही वृत्तपत्रांनी दि. १७ व १८ जून २०२६ रोजी या प्रकरणाची बातमी प्रसिद्ध केली आहे.
*काय आहे प्रकरण?*
संस्थेचे संस्थापक व ज्येष्ठ संचालक जिभाऊ नारायण शेवाळे (८४, रा. टेहरे) यांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने आदेश दिल्यावर *छावणी पोलीस ठाण्यात* गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संस्थेचे सदस्य व माजी मुख्याध्यापक *ज्ञानदेव दामू पाटील*, त्यांची पत्नी *कमल पाटील* व सून *प्रियंका चिंतामण गांगुर्डे* (रा. कलंत्री बंगल्याजवळ, सोयगाव) यांनी संगनमत करून शाळेच्या *तीन बँक खात्यांमधून ₹ २८,५५,२९०* रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.
*अपहाराची पद्धत (२०२० ते २०२४):*
– कालावधी: २२ जून २०२० ते ७ ऑगस्ट २०२४
– शालेय पोषण आहार अनुदान खात्यातून (पंजाब नॅशनल बँक): ₹ २३,४७,२८७ पत्नी व सुनेच्या नावाने काढले
– इतर खात्यातून: ₹ १,१५,२५७ व ₹ ३,९२,७४६ स्वतःच्या नावाने काढले
– बनावट व खोटी कागदपत्रे तयार करून संस्थेची फसवणूक व विश्वासघात केल्याचा ठपका
– कलम: ३१८(४), ३१८(३), ३१६(४), ६१(२) अन्वये गुन्हा
तपास पोलीस निरीक्षक दीपक जाधव करीत आहेत.
*दुसरे प्रकरण – शिक्षक भरतीच्या नावावर फसवणूक व वेठबिगारी:*
सोयगाव येथील *अमोल लक्ष्मण साळुंके (३८)* यांनीही छावणी पोलीसात तक्रार दिली आहे. साळुंके यांचे २०१३ मध्ये http://B.Ed पूर्ण झाले. २०१५ मध्ये समता विद्यालयात पूर्णवेळ शिक्षकाची जागा रिक्त असल्याचे सांगून संस्थाचालक ज्ञानदेव पाटील यांनी *₹ ३ लाख ३० हजार* उकळले.
मात्र कोणताही नियुक्ती आदेश न देता त्यांना २०१५ ते २०२४ या ९ वर्षांच्या कालावधीत विनावेतन इंग्रजी विषय शिकवण्यास लावले. इतकेच नव्हे तर स्वतःच्या खाजगी गाडीवर ड्रायव्हर, घरातील घरगडी व कार्यक्रमांमध्ये फोटो काढण्याचे काम करायला भाग पाडले.
२०१९ मध्ये शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठवण्याच्या नावाखाली आणखी ₹ ३० हजार घेतले. २०२१ मध्ये पुन्हा ₹ ७ लाखांची मागणी केली, पैसे नसल्याचे सांगितल्यावर जातीवाचक अपमान केल्याचा आरोप फिर्यादीत आहे. मानसिक तणावातून वडिलांचा मृत्यू झाल्याचेही साळुंके यांनी म्हटले आहे. या प्रकरणी *फसवणूक व अॅट्रॉसिटी कायद्यान्वये* गुन्हा दाखल झाला आहे.
*MAI MEDIA 24 ची भूमिका:* शिक्षण संस्थेतील हा प्रकार गंभीर असून विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराच्या पैशावरच डल्ला मारणे हे अत्यंत निंदनीय आहे. प्रशासनाने सखोल चौकशी करावी!
*- शीतल हरीश करदेकर, संपादक, MAI MEDIA 24*
http://www.maimedia24.in
—




















