Home Uncategorized *बृहन्मुंबई क्षेत्रात सार्वजनिक स्थळी थुंकल्यास २५०, कचरा टाकल्यास ५००, ओला व सुका...

*बृहन्मुंबई क्षेत्रात सार्वजनिक स्थळी थुंकल्यास २५०, कचरा टाकल्यास ५००, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास २००, विनापरवाना राडारोडा वाहतूक केल्यास २५ हजार रुपये दंड*

57
0

*• बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून घनकचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी), स्वच्छता आणि स्वच्छताविषयक उपविधी (Bylaws) जारी*

*• विविध आस्थापनांमधील कचरा व्यवस्थापन, प्रक्रिया आदींबाबत नियमावलीचा समावेश*

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून घनकचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी), स्वच्छता आणि स्वच्छताविषयक उपविधी (Bylaws) – २०२५ जारी करण्यात येत आहे. यामध्ये कचरा निर्माण करणारे घटक, विविध आस्थापना, कचराविषयक सेवा प्रदाता; घनकचरा व्यवस्थापन, साठवणूक, वितरण व प्रक्रिया, आदींबाबत नियमावलींचा समावेश आहे. नागरिक किंवा आस्थापनांनी यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या अंतर्गत, सार्वजनिक स्थळी थुंकल्यास २५०, कचरा टाकल्यास ५००, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास २००, विनापरवाना राडारोडा वाहतूक केल्यास २५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली बृहन्मुंबई (मुंबई शहर आणि उपनगरे) कार्यक्षेत्रातील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमितपणे कार्यवाही केली जाते. यासह वेळोवेळी विशेष स्वच्छता मोहीम आणि उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर, सदर उपविधी (Bylaws) जारी करण्यात येत आहे.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले की, बृहन्मुंबई (मुंबई शहर आणि उपनगरे) क्षेत्रातील घनकचऱ्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून अविरतपणे प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने, मुंबई महानगरात निर्माण होणाऱ्या किंवा आणल्या जाणाऱ्या ओल्या व सुका कचऱ्याचे वर्गीकरण व प्रक्रिया यासंबंधी सर्व बाबींचे नियमन करण्याच्या हेतुने तसेच केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरणीय बदल विभागाने जारी केलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ च्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून घनकचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी), स्वच्छता आणि स्वच्छताविषयक उपविधी (Bylaws) -२०२५ जारी करण्यात येत आहे.

सदर उपविधीतील नियम कचरा निर्माण करणारे सर्व व्यक्ती, सार्वजनिक व खासगी ठिकाण; निवासी, व्यापारी, वाणिज्यिक, व्यावसायिक, औद्योगिक, शासकीय, निमशासकीय, प्रशासकीय, शैक्षणिक, धार्मिक, मनोरंजनात्मक, सामाजिक तसेच इतर सर्व प्रकारच्या वापराच्या स्थळांसाठी लागू असतील. यामध्ये प्रामुख्याने कचरा टाकण्यास व इतर उपद्रवांवर बंदी आणि ‘स्वच्छ आंगण / परिसर / जागा’ सुनिश्चित करणे; घनकचऱ्याचे विलगीकरण करणे; नागरी घनकचऱ्याची साठवणूक आणि वितरण; उत्पादक, महानगरपालिका प्रशासन, प्रतिनिधी आणि कंत्राटदार यांची जबाबदारी व कर्तव्ये; वस्तू पुनर्प्राप्ती सुविधा (एमआरएफ); घनकचरा, जैव-वैद्यकीय कचरा, ई-कचरा, बांधकाम व पाडकाम राडारोडा,प्लास्टिक कचरा आदींसंदर्भात सविस्तर नियमावलीचा समावेश आहे. विविध आस्थापना, नागरिक तसेच संबंधित सर्वांनी मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. आपले घर, परिसर आणि अन्य सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. उपविधीतील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन देखील डॉ. अश्विनी जोशी यांनी केले.

उपविधी अंतर्गत महानगरपालिकेकडून विविध प्रकारच्या २१ उपविधींबाबत दंडात्मक कारवाईदेखील निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये, रस्ते / गल्ल्या / पदपथ / बाग / सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. ५००), थुंकणे (रु. २५०), खुल्या आणि सार्वजनिक जागांवर आंघोळ (रु. ३००), लघवी करणे (रु. ५००), शौच करणे (रु.५००), मोकळ्या जागी व सार्वजनिक ठिकाणी प्राणी किंवा पक्ष्यांना खाद्य देणे (रु.५००), सार्वजनिक ठिकाणी भांडी / कपडे/ इतर कोणत्याही वस्तू धुणे (रु.३००), वाहन धुणे (रु.५००), अंगण स्वच्छ न ठेवणे (एकाच जागेच्या मालकांसाठी / रहिवाशांसाठी रु. ५०० आणि इतरांसाठी रु.१५००), कचरा वर्गीकरण न करता व स्वतंत्र डब्यांमध्ये साठवून न ठेवता सुपूर्द केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी (वैयक्तिक रु. २०० आणि मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्यांसाठी रु. १०००), अनधिकृत किंवा नियुक्त नसलेल्या ठिकाणी बांधकाम व पाडकाम कचरा अस्ताव्यस्तपणे टाकणे (प्रतिवाहन रु.२०,०००), विनापरवाना बांधकाम व पाडकाम कचऱ्याची वाहतूक करणे (प्रतिवाहन रु.२५,०००), सुका कचरा स्वतंत्रपणे वेगळा करून न देणे (रु.२००), बागेतील कचरा व झाडांची छाटणी निर्दिष्ट केल्याप्रमाणे न करणे (रु.२००), व्यावसायिक कारणांसाठी / मोठ्या प्रमाणात कचरा जाळणे (रु.१०,०००); मासे, कुक्कुटपालन आणि मांसविषयक कचरा स्वतंत्रपणे वर्गीकरण करुन न देणे (रु.७५०), कंटेनर/कचरा टोपली/ कचरापेटी नसलेले विक्रेते /फेरीवाल्यांसाठी (रु.७५०), कचरा स्वतंत्रपणे वर्गीकरण करुन न देणारे विक्रेते/ फेरीवाले (रु.७५०), घरासमोरील गटार (घराचा नाला) स्वच्छ न ठेवणे (रु.५००), पाळीव प्राण्यांनी कचरा पसरवणे/शौच करणे (रु.१०००), सार्वजनिक मेळावा/ कार्यक्रमानंतर ४ तासांच्या आत स्वच्छता न करणे (स्वच्छता ठेव जप्त करणे) या उपविधींचा समावेश आहे.
****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here