मुंबई, दि २१ : नवी दिल्ली येथे आजपासून आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन परिषद (IICDEM) सुरू झाली आहे. या परिषदेसाठी जगभरातील आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचे आगमन झाले असून, आतापर्यंत ३२ देशांतील सुमारे ७१ प्रतिनिधी नवी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत.
ही तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद २१ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान भारत मंडपम, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचा शुभारंभ आज भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हस्ते शिष्टमंडळ प्रमुखांच्या औपचारिक स्वागताने होणार असून, यावेळी निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी उपस्थित असतील.
या परिषदेत ७०हून अधिक देशांतील सुमारे १०० आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, विविध आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी, भारतातील परदेशी मिशन्स तसेच निवडणूक क्षेत्रातील शैक्षणिक आणि कार्यरत तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. लोकशाही, निवडणूक व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय निवडणूक मानके, तसेच निवडणूक प्रक्रियेतील नवकल्पना आणि उत्तम पद्धती यावर सखोल चर्चा होणार आहे.
परिषदेदरम्यान उद्घाटन सत्र, EMB (Election Management Body) लीडर्स प्लेनरी, कार्यगट बैठका तसेच विविध विषयांवरील सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ३६ विषयक गटांमध्ये राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी नेतृत्व करणार असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक तज्ज्ञ त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चांमध्ये ४ आयआयटी, ६ आयआयएम, १२ राष्ट्रीय विधी विद्यापीठे (NLU) आणि भारतीय जनसंचार संस्था (IIMC) यांसारख्या अग्रगण्य संस्थांचा सहभाग असणार आहे.
याच वर्षी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स’ (International IDEA) या संस्थेच्या सदस्य राष्ट्र परिषदेचे २०२६ सालासाठी अध्यक्षपद स्वीकारले आहे. त्या अनुषंगाने, IICDEM-2026 मध्ये भारताची ‘समावेशक, शांततापूर्ण, सक्षम आणि शाश्वत जगासाठी लोकशाही’ ही व्यापक संकल्पना केंद्रस्थानी राहणार आहे.
IICDEM-2026 परिषदेमुळे लोकशाहीच्या भवितव्यावर आणि निवडणूक प्रशासनावर जागतिक पातळीवरील उच्चस्तरीय संवादाला नवी दिशा मिळणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000


















