*मरोळ येथील महानगरपालिका मंडई, महानगरपालिका दवाखाना या दोन इमारतींचे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न*
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, आर्थिक विकास केंद्र आहे. जागतिक दर्जाचे महानगर होण्याच्या दिशेने मुंबईची वेगाने वाटचाल सुरु आहे. खड्डेमुक्त रस्ते, सुशोभित मुंबई, आपला दवाखाना या विविध माध्यमातून मुंबईकरांना उत्तमोत्तम मूलभूत सेवा-सुविधा पुरविण्यात येत आहेत. मुंबईकरांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री . एकनाथ शिंदे यांनी केले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मरोळ (अंधेरी पूर्व) येथील महानगरपालिका मंडईचा पुनर्विकास आणि महानगरपालिका दवाखान्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे. मंडई आणि दवाखाना या दोन्ही इमारतींचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज (दिनांक २० जुलै २०२५) करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
स्थानिक आमदार मुरजी पटेल, महानगरपालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ ३) विश्वास मोटे, बाजार विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त . नितीन शुक्ला यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
*मरोळ मंडई प्रकल्पाची माहिती-*
अंधेरी (पूर्व) येथील मरोळ चर्च मार्ग परिसरातील महानगरपालिका मंडईचे पुनर्विकास काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी बी. जे. मेहता यांची वास्तू सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या मंडईत अधिकृत परवानाधारक व्यावसायिकांची संख्या एकूण ९४ इतकी आहे. या मंडईत भाजीपाला, मासळी गाळे आहेत. १०६१.६० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या भूखंडावर प्रस्तावित आराखड्यानुसार, तळघर अधिक तळमजला अधिक ५ मजली इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे.
३ चटईक्षेत्र निर्देशांक (FSI) अनुज्ञेय असलेल्या या भूखंडावर एकूण ३१८५.८० चौरस मीटर क्षेत्रफळ इतक्या बांधकामास परवानगी आहे. नवीन पाच मजली इमारतीत तळमजला आणि पहिला मजल्यावर विद्यमान परवानाधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. तर, दुसरा मजला प्रकल्प बाधित (PAP) यांच्यासाठी असेल. तिसरा, चौथा आणि पाचवा मजला बाजार सभागृहासाठी असेल. मंडई ग्राहकांच्या सोयीसाठी शाकाहारी आणि मांसाहारी गाळे वेगवेगळ्या मजल्यांवर राहतील.
इमारतीच्या आराखड्यास प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. नियोजित इमारत ही अद्ययावत सोयीसुविधांयुक्त राहील. यामध्ये, माल चढवणे/ उतरविणे यांच्यासाठी धक्का, साहित्याची ने आण करण्यासाठी उद्वाहन (Lift), वाहनतळ, गोदाम नि शीतगृह, दिव्यांग व्यक्तींसाठी उतरंड (Ramp), प्रसाधनगृह, मंडईसाठी स्वतंत्र जिने आणि उद्वाहन आदींची सोय करण्यात आली आहे. अधिकृत परवानाधारक व्यावसायिकांच्या सूचनेनुसार, अंतर्गत सजावट करण्यात येणार आहे. तसेच, इमारत परिसरात हरितक्षेत्र (Landscaping) देखील करण्यात येणार आहे.
संपूर्ण प्रकल्पास सुमारे दोन वर्षांचा कालावधी आवश्यक आहे. या कालावधीत अधिकृत परवानाधारक व्यावसायिकांना तात्पुरत्या जागी स्थलांतरित करण्यात येईल. इमारत पूर्णत्वास आल्यानंतर अधिकृत परवानाधारक व्यावसायिक पुनर्स्थापित करण्यात येतील.
*मरोळ दवाखाना प्रकल्पाची माहिती-*
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मरोळ दवाखाना वास्तूची देखील पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. या दवाखान्याच्या तळमजला अधिक दोन मजली इमारत पुनर्बांधणी कामास सन २०२२ मध्ये मान्यता मिळाली आहे. उपप्रमुख अभियंता (आरोग्य पायाभूत सुविधा कक्ष) यांच्याकडून अंदाजपत्रक व निविदा कामकाज प्रगतिपथावर आहे. मुंबई अग्निशमन दल, विमानतळ प्राधिकरण, इमारत प्रस्ताव विभागाकडून प्रस्तावित इमारतीस मंजुरी मिळाली आहे.
या दवाखान्याच्या भूखंडाचे क्षेत्रफळ ८७४०.९४ चौरस फूट इतके आहे. तळमजला अधिक पाच मजले (G+5) अशी नवीन प्रस्तावित इमारतीची रचना आहे. तळमजल्यावर प्रवेश प्रांगण (LOBBY), थेट निरीक्षण उपचार कक्ष (DOT ROOM), लसीकरण कक्ष, वाहनतळाची सुविधा असेल. पहिल्या व दुस-या मजल्यावर दवाखाना व हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल. तिस-या मजल्यावर‘हेल्थ पोस्ट’आणि चौथ्या व पाचव्या मजल्यावर सार्वजनिक – खासगी भागीदारी तत्त्वावर (PPP) डायलिसिस केंद्र उभारण्याचे नियोजित आहे.
या दोन्ही वास्तू जिथे मोडतात, त्या के पूर्व विभागाची लोकसंख्या सुमारे ८.८५ लाख आहे. तर, मरोळ परिसराची अंदाजित लोकसंख्या १.७५ लाख इतकी आहे. सद्यस्थितीत मरोळ परिसरात मरोळ दवाखाना आणि मरोळ मरोशी हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यरत आहे. त्यापैकी मरोळ दवाखाना इमारत संरचनात्मक परीक्षणानुसार धोकादायक घोषित करण्यात आल्याने हा दवाखाना सध्या मंगला नर्सिंग होम येथे स्थलांतरित करण्यात आला आहे.
***
















