Home मनोरंजन *चित्रनगरीच्या कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यावर भर*

*चित्रनगरीच्या कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यावर भर*

272
0

*अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एआयचे विशेष प्रशिक्षण सत्र घेण्यात आले*

*मुंबई, ६ मे* : कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कार्यप्रणाली कशी वाढवता येईल, यासंबंधीचे खास प्रशिक्षण सोमवारी गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील अधिकारी आणि कर्मचारी यांना देण्यात आले. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या खास प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.

शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमातर्गत एक विशेष प्रशिक्षण सत्र कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आले. ‘इवाय’चे वरिष्ठ सल्लागार सारंग मोहरे आणि अवनी मुळे यांनी सखोल मार्गदर्शन केले.

या सत्राचा मुख्य उद्देश मोठ्या भाषिक मॉडेल्सचा (LLMs) वापर करून शासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडण्याची शक्यता तपासणे हा होता. या सत्रात सहभागी झालेल्या कर्मचारी- अधिकाऱ्यांना ‘प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग’ या संकल्पनेची ओळख करून देण्यात आली. याद्वारे एआयला योग्य प्रकारे मार्गदर्शन करणारे इनपुट देऊन त्याकडून उपयुक्त आणि आपल्याला हव्या असलेल्या संदर्भानुरूप आउटपुट कसे मिळवले जाते, याची माहिती यावेळी देण्यात आली.

या प्रशिक्षणादरम्यान कामांमध्ये एआयचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये बहुभाषिक संभाषणे करणे, दस्तऐवज व तक्ते स्वयंचलितपणे टाइपसेट व फॉरमॅट करणे, बैठकांची नोंद व अहवाल तयार करणे, तसेच मोठ्या प्रमाणातील असंघटित डेटाचे विश्लेषण करून त्यातून आवश्यक माहिती मिळवणे अशा विविध गोष्टींची माहिती देण्यात आली. या पारंपरिक आणि पुनरावृत्ती होणाऱ्या कामांना अधिक कार्यक्षम एआय आधारित प्रक्रियांमध्ये रूपांतरित करण्याच्या दृष्टिकोनातून हे सत्र आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षणास उपस्थित कर्मचारी-अधिकाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासकीय विभागांमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची तयारी आणि उत्सुकता आहे हे यावेळी जाणवले. शासन कार्यप्रणालीत डिजिटल परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने हे सत्र एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here