Home Uncategorized प्लॅनेट मराठी आणि माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न – अक्षय बर्दापूरकर

प्लॅनेट मराठी आणि माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न – अक्षय बर्दापूरकर

139
0

काही दिवसांपूर्वी प्लॅनेट मराठीच्या माजी सहसंस्थापिका सौम्या विळेकर यांनी फसवणूक केल्याबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली होती. या संदर्भात आता अक्षय बर्दापूरकर यांनी मौन सोडले असून त्यांनी याबाबत खुलासा केला आहे.

या प्रकरणाबाबत प्लॅनेट मराठी संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” मी मराठी इंडस्ट्रीतील एक अनुभवी निर्माता असून गोष्ट एका पैठणीची, चंद्रमुखी, एबी आणि सीडी, तमाशा लाईव्ह या आणि अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे, ज्यामध्ये काहींना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. माझ्या आणि प्लॅनेट मराठी ग्रुपच्या व्यवस्थापनाविरुद्ध करण्यात आलेले खोटे, निराधार आणि बदनामीकारक आरोप वाचून मी अत्यंत दुःखी आणि आश्चर्यचकित झालो आहे. काही व्यावसायिक वाद आहेत, जे पूर्णतः नागरी स्वरूपाचे (सिव्हिल) असून त्यांना फसवणुकीचे स्वरूप देणे हे हास्यास्पद आहे. हे आरोप माझी आणि माझ्या संस्थेची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने लावले गेले आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आणि माझे वकील त्यावर काम करत आहेत. सध्या तरी यावर मी अधिक भाष्य करू इच्छित नाही.”

अक्षय बर्दापूरकर पुढे म्हणाले, ”सौम्या विळेकर यांनी या संदर्भात काही विधाने केली आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांची वेळ आणि उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रक्रिया याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हे स्पष्ट आहे की, त्यांनी माझ्या आणि प्लॅनेट मराठी ग्रुपच्या व्यवस्थापनावर केलेले आरोप हे हेतुपुरस्सर आहेत आणि त्यांनी केलेल्या करारांप्रती असलेली त्यांची जबाबदारी चुकवण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. प्रत्यक्षात मी आणि प्लॅनेट मराठी ग्रुप त्यांच्या कृतीमुळे फसवले गेलो असून, आमचे वकील या प्रकरणाला योग्य तो प्रतिसाद देत आहेत आणि आमच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली तरी आम्ही ती समर्थपणे लढू. सत्य समोर येईलच. हे अधोरेखित करणे आवश्यक आहे की, पीएमएसएसपीएलमध्ये सौम्या विळेकर आणि त्यांचा मुलगा अनित्य विळेकर हेच एकमेव संचालक होते आणि ते बहुसंख्य भागधारक होते. कंपनीच्या संपूर्ण ऑपरेशन्स आणि वित्तव्यवस्थेवर त्यांचे नियंत्रण होते. त्यांनी मला जेव्हा आपले समभाग विकले, तेव्हा त्यांनी अनेक गोष्टींवर चुकीची माहिती दिली, ज्या अलीकडे उघडकीस आल्या. मी त्यांची कोणतीही फसवणूक केली नाही किंवा त्यांना कोणतेही कृती करण्यास भाग पाडले नाही. त्यांचे आरोप संपूर्णपणे निराधार आहेत. मी माझ्या वकिलांच्या सल्ल्यानुसार योग्य ती कायदेशीर पावले उचलत आहे. मी देश सोडून जात असून कंपनी बंद पडणार आहे, अशा अफवाही पसरवल्या जात असून त्यात काहीही तथ्य नसून आतापर्यंत प्लॅनेट मराठीबद्दल प्रसिद्ध झालेल्या बातम्या या केवळ एकतर्फी आहेत. एक गोष्ट आवर्जून सांगेन, हे सगळे असले तरी प्लॅनेट मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कुठेही कमी पडणार नाही. यापुढेही आम्ही प्रेक्षकांसाठी दर्जेदार मनोरंजनाचा खजिना घेऊन येणार आहोत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here