Home Uncategorized एआरटी केंद्रातील महिला बचतगटांच्या प्रयत्नांना स्वयम् मेळाव्यातून बळ

एआरटी केंद्रातील महिला बचतगटांच्या प्रयत्नांना स्वयम् मेळाव्यातून बळ

130
0

मुंबईतील एआरटी केंद्रांमध्ये उपचार घेणाऱ्या २८७ महिलांचा सहभाग

मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेमार्फत जागतिक एड्स दिनानिमित्त स्वयम् मेळ्याचे आयोजन आज (दिनांक २ डिसेंबर २०२४) करण्यात आले होते. एंट्रीरेट्रोव्हायरल थेरपी (ART) केंद्रातील एचआयव्हीसह जगणाऱ्या महिलांसाठी सक्षमीकरणाचा मार्ग म्हणून या मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासोबतच एआरटी केंद्रातील महिला बचत गटांच्या वस्तुंच्या विक्रीसाठीच्या स्टॉलची मांडणीही यानिमित्ताने मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या प्रांगणात करण्यात आली होती. मुंबईतील एआरटी केंद्रांमध्ये उपचार घेणाऱ्या २८७ महिला आणि स्पर्धकांनी या स्वयम मेळ्यात सहभाग घेतला होता.

एआरटी केंद्रामधील एचआयव्हीसह जगणाऱ्या महिलांच्या पाठीशी उभे राहतानाच महिला सक्षमीकरणाला अधिकाधिक पाठबळ देण्यारे उपक्रम राबविण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार एआरटी केंद्रातील महिलांच्या बचतगटांच्या उत्पादनांना प्राधान्याने बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी केली. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सहभागी महिला बचतगटांच्या सदस्यांसाठी रांगोळी, पाककृती, कलाकौशल्य, नृत्य, फॅशन शो यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बचतगटाच्या माध्यमातून प्रत्येक एआरटी केंद्रातून महिलांनी पुढे येऊन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःचा विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे मत मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक तथा उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. संजय कुऱ्हाडे यांनी याप्रसंगी मांडले.

एआरटी केंद्रामधील एचआयव्हीसह जगणाऱ्या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरणाचा मार्ग निवडला आहे. आज आयोजित कार्यक्रमामध्ये ‘आयुष्यावर बोलू काही’ या स्पर्धेच्या माध्यमातून एचआयव्हीसह आलेल्या चांगल्या आणि वाईट अनुभवांवर महिला या कार्यक्रमप्रसंगी व्यक्त झाल्या. तसेच विविध आव्हानात्मक प्रसंगावर केलेली मात यासाठीचे अनुभवकथनही महिलांनी केले. स्वयम मेळाव्याच्या निमित्ताने बचत गटाचे फायदे, एआरटी औषधोपचाराचे सातत्य, एचआयव्ही / एड्स कायद्याबाबतही विविध सत्रांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित शिबिरामध्ये आयुषमान भारत (ABHA), प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY) या सामाजिक सुरक्षा योजनांचविषयी मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here