मुंबई,
लास्ट माईल कनेक्टीव्हीटी (Last Mile Connectivity) अंतर्गत बीकेसी ते गोरेगाव मेट्रो स्टेशन पासून प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी ऑटोरिक्षा व टॅक्सीच्या प्रस्तावित थांब्यांची उभारणी करण्यासाठी संभाव्य जागांची आज परिवहन आयुक्त विवेक भिमनवार व अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
यावेळी सह पोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे विभागीय महाव्यवस्थापक राजेंद्र इंगळे, परिवहन विभागाचे सह आयुक्त रवी गायकवाड, उपायुक्त अनिल पाटील, बोरिवली, मुंबई (पश्चिम) व मुंबई (पूर्व) चे प्रादेशिक परिवहन अधिकारी, तसेच मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि., वाहतूक पोलीस विभाग व परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी बीकेसी ते गोरेगाव दरम्यान मेट्रोच्या सर्व स्टेशनची पाहणी करुन प्रवाशांना मेट्रो स्टेशनपासून त्यांच्या निश्चित स्थळी वेळेत पोहचण्यासाठी रिक्षा अथवा टॅक्सी त्वरीत उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून सदरचे थांबे उभारण्यात येणार आहे. लास्ट माईल कनेक्टीव्हीटी (Last Mile Connectivity) अंतर्गत ऑटोरिक्षा स्टॅण्ड व टॅक्सी स्टॅण्डच्या उभारणीसाठी प्रस्तावित थांब्यांची निश्चिती करण्यास्तव ही पाहणी करण्यात आली. लवकरच या तिन्ही विभागाच्या समन्वयातून थांबे निश्चित करुन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण (MMRTA) ला प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे सह आयुक्त रवी गायकवाड यांनी कळविले आहे.

















