*मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षास केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी दिली भेट*
मुंबई, दि. १२ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या प्रसार माध्यम कक्षास केंद्रीय निवडणूक निरीक्षक समीर वर्मा, सत्यप्रकाश टी. एल. व केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी भेट देऊन माहिती घेतली.

यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी माध्यम कक्षाच्या नियोजनबद्ध कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले आणि माध्यम कक्षाच्या दैनंदिन कामकाजाविषयी त्यांनी माहिती घेतली. माध्यम कक्षात दररोज येणाऱ्या विविध वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांची नोंद घेण्याची आणि जाहिरातींचे अवलोकन करण्याची पद्धत याविषयीदेखील त्यांनी जाणून घेतले. सोशल मीडियावर मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचे फेसबुक, एक्स, इन्स्ट्राग्राम तसेच इतर सोशल मिडीयावर प्रसारीत होणाऱ्या जाहिराती, पोस्टवर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
प्रसार माध्यम कक्षाच्या समन्वय अधिकारी काशीबाई थोरात यांनी प्रसार माध्यम कक्षाच्या कामकाजाची माहिती दिली.


















