Home तत्त्वज्ञान/ साहित्य आणि मला सुख सापडले……हो! – ✍️रा.ग.सोनुने गुरुजी

आणि मला सुख सापडले……हो! – ✍️रा.ग.सोनुने गुरुजी

81
0

आणि मला सुख सापडले……हो! –
✍️रा.ग.सोनुने गुरुजी
(मानसशास्त्र तत्वज्ञान अभ्यासक )

माझे पुण्य फळास आले.कर्माच्या झाडावरुन अलगद सुख खाली पडले आणि मला सुख सापडले.खूप मोठ्या कोलाहलात मी शांत बसलो होतो.या शांतताने अंतर्भाव जागा झाला.या आतील भावाने अंतर्मन ढवळून निघाले.मनाच्या हिंदोळ्यावर असंख्य भावभावनांचा उद्रेक झाला.अनेक विचारांची उत्पत्ती झाली.पण मन आतून शांतच राहीले.या दरम्यान ‘मी’ हा विचार करणारा नव्हताच.मी हा विचार व भावना पाहणारा ‘साक्षी’ होता.या भाऊगर्दीत व विचार कल्लोळात मला सुख सापडले हो!मी सुखाची किंमत मोजली.बाहेरील कल्लोळात मन शांत ठेवले,दिव्य झाले.तसे बघितले तर मनाला स्थिर ठेवणे फार आव्हानात्मक आहे.मन आणि मनाला पाहणारा(साक्षी)असला म्हणजे मनाला स्थिरता प्राप्त होते.स्थिर मन स्थितप्रज्ञ होते.अशा वेळी मनाला गोंधळून टाकता येत नाही.मन बाहेरील परिस्थितीविरुद्ध लढते आणि यशस्वी होते.सुखाचा खरा स्वभाव यातून तावून सुलाखून निघतो.सुखाच्या मागे लागले तर सुख दूरदूर पळते.
म्हणून स्वामी विवेकानंद सुखाविषयी म्हणतात की,एखादे काम तुम्ही सुखासाठी करु नका तर सुखी होऊन करा.सुखाची स्थिती मनात निर्माण केल्यास आपल्याला हव्या त्या कामात सुख सापडते.अन्यथा जगात सुख कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही.कामात सुख शोधणे म्हणजेच सुखाची आराधना करणे होय.
आपण म्हणतो,परमेश्वरा मला सुखी कर.परंतु परमेश्वर पाहतो की,सुखी होण्यासाठी कोण पात्र आहे?ज्यांच्या मनात सुख आहे,त्यांनाच परमेश्वर सुखी करतो.सुखाची कसोटी ही सशक्त व सुखी मन आहे,हे विसरुन कसे बरे चालेल…
आम्ही सुखाचे कमी पण दु:खाचे चिंतन जास्त करतो,त्यामुळे दु:खी होतो.मला सुख अतिशय सुक्ष्म आणि दु:ख पर्वता एवढे दिसते.त्यामुळे मला सुखी होता येत नाही.
अनेकानेक लोकांचे सुख पाहून जर मी सुखी होत असेल तर मी जीवनाच्या अतिशय योग्य वळणावर आहे.महान तत्त्वज्ञ जेरेमी बेंथेम म्हणतो, “The greatest happiness of greatest number.” जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख हे समाधानी समाजाचे लक्षण आहे.मी स्वतःसुखी असून चालणार नाही तर समाज सुध्दा सुखी पाहिजे.हा विश्व सुखाचा मार्ग मला समृध्द व सुखी स्थितीकडे घेऊन जातो.महान तत्त्वज्ञ प्लेटो म्हणतो,सुख हे इंद्रियभोगात नसून विवेकपुर्ण जगण्यात आहे.सुख हे कोणत्याही वस्तूत नसून सर्वस्वी मनावर अवलंबून असते हे समजणे म्हणजे सुखी होणे होय.सुख हे मानवी मनाच्या चेतनेवर अवलंबून असते.सुख मिळवायचे असेल तर तुलना नसावी.अपेक्षा नसावी.भुतकाळाचा पश्चात्ताप नसावा.भविष्याची चिंता नसावी.वस्तूत:सुख हे शोधायचे नसते तर सुख हे आपल्याच ठायी असते,हे ओळखायचे असते.एखादे काम सुखासाठी नव्हे तर सुखी होऊन होत असेल तर नक्कीच सुख मिळते.
पैसा,नाते यातून सुख मिळते पण सुख जर यावरच अवलंबून असेल तर दु:ख मिळणार हे नक्की.स्वत:च्या मनाला विचारा की,जगी सुखी कोण आहे?
पण मनाला हे सांगा…हे मना तू सुखी होऊ शकतो.तू सुखकर्ता आहे.मनात जर आणले तर तू दु:खकर्ताही होऊ शकतो.सर्व मनाचा खेळ आहे.विनोबा भावे म्हणायचे की,मन हा केंद्रबिंदू आहे.मन जसे करेल,तसं तुम्ही करत राहता.मी दु:खी आहे असं तुम्ही म्हणू शकता,मी सुखी आहे असंही तुम्ही म्हणू शकता.मुख्य म्हणजे परिस्थिती काय आहे हे महत्त्वाचे नसून मन:स्थिती काय आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अशा सशक्त मन:स्थितीमुळे मी म्हणू शकतो…. आणि मला सुख सापडले….हो!

बुलढाणा
मो.८८८८४२०६२९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here