Home अग्रलेख “आई, तुझ्या लेकरांचं सुख हेच आमच्या जगण्याचंही सुख!” ...

“आई, तुझ्या लेकरांचं सुख हेच आमच्या जगण्याचंही सुख!” *या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता।* *नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥- लेखक :सचिन देव(अध्यात्मिक ,सामाजिक पत्रकार) ,विश्लेषण आणि मुख्य पैलू:संपादक: शीतल हरीश रामचंद्र (बुवा) करदेकर

86
0

*”आई, तुझ्या लेकरांचं सुख हेच आमच्या जगण्याचंही सुख!”*-* *लेखक :सचिन देव*
*(अध्यात्मिक ,सामाजिक पत्रकार)*

*विश्लेषण आणि मुख्य पैलू:संपादक:* *शीतल हरीश रामचंद्र (बुवा) करदेकर*

*या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता।*
*नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥*

*सर्व प्राणिमात्रांत भुकेच्या रूपाने स्थित असलेल्या देवीला वारंवार नमस्कार असो!*

*भूक ही केवळ पोटाची नसते; ती ज्ञानाची असते, अनुभवाची असते, आपल्या माणसांना भेटण्याची असते, काहीतरी मिळवण्याची असते… ही भूकच आपल्याला जीवनात पुढे पुढे नेत असते. पण आई, तू ही भूक आम्हाला केवळ भोग मिळवत राहण्यासाठीच दिली आहेस, की त्यातून आमचे जीवन अधिक समृद्ध व्हावे म्हणून?*

जिज्ञासा असेल तर उत्तर मिळाल्यावर समाधान लाभते. भेटीची आतुरता असेल तर भेटीचा आनंद कळतो. आरतीत आर्तता असेल तर प्रसन्नतेचा प्रसाद मिळतो. आणि पोट भरलेले असेल, तर पंचपक्वान्नांचाही आस्वादही बेचव वाटतो! म्हणूनच आई, जीवनात भुकेला इतके महत्त्व आहे.

पण या भुकेला कोणते वळण मिळते, यावर आपल्या जगण्याचे सौंदर्य अवलंबून असते.

चार कारखाने असतानाही आठ कारखाने उभे करण्याच्या ध्यासात आपण इतके गुंतून जावे की प्रभूच्या स्मरणासाठीही वेळ उरू नये? की आपण जे मिळवले, त्यातून आपल्या माणसांच्या, समाजाच्या आणि राष्ट्राच्या जीवनातही आनंद फुलावा?

सुरुवातीला मी एकटा होतो… मग आम्ही दोघे झालो. पुढे मुलंबाळं आली, कुटुंब वाढलं. मग त्यांच्या सुख-दुःखाचा विचार आपल्या जगण्यात सहजपणे सामावला. त्यानंतर समाज, राष्ट्र आणि त्याही पलीकडे समस्त जीवसृष्टीविषयी आपलेपणा वाटू लागला… ही आपल्या जाणिवांची, प्रेमाची आणि उदात्ततेची वाढती वर्तुळे नाहीत का?

आयुष्याची सत्तरी पार केली, तरी आपल्या विचारांचं केंद्र केवळ ‘मी आणि माझं’ एवढंच राहिलं, तर आईच्या चरणी आपण काय घेऊन आलो? आणि इतकी वर्षं जगूनही आपल्या जगण्याचा परीघ विस्तारलाच नाही, तर आपल्या प्राप्तीला कोणता अर्थ उरला?

आई, तुझ्यापुढे फेर धरताना आम्ही सारे एक होतो. एका सुरात, एका तालात, एका भावनेत… कारण या सगळ्यांच्या केंद्रस्थानी तू असतेस! कोण मोठं, कोण लहान, कोण श्रीमंत, कोण गरीब या साऱ्या भेदांपलीकडे आम्हाला जोडणारा एक समान धागा म्हणजे तू!

मग हा फेर केवळ नवरात्रीपुरता कसा राहील? तुझ्या लेकरांपैकी एखादं भुकेलं असेल, एखादं दुःखात असेल, एखाद्याला आधाराची गरज असेल, तर त्याच्यापर्यंत पोहोचणारी आपली संवेदनाही तुझ्याच भक्तीचा भाग नाही का?

आई, तुझ्यासमोर फेर धरताना आमचे हात हातांत गुंफले जातात; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आमची मनंही एकमेकांशी जोडली जावीत. आमच्या भुका वेगवेगळ्या असतील, इच्छा वेगवेगळ्या असतील, वाटा वेगवेगळ्या असतील; पण त्या साऱ्यांना जोडणारा भाव एकच असावा ‘आई, तुझ्या लेकरांचं सुख हेच आमच्या जगण्याचंही सुख आहे!’

आणि म्हणूनच या मंत्राचा अर्थ मनात रुंजी घालत राहतो…
या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता…!

आई, आमच्यात भूक तूच निर्माण करतेस; तृप्तीचा आनंदही तूच देतेस. फक्त आमची भूक एवढी संकुचित राहू देऊ नकोस की त्यात आम्हाला दुसऱ्याची भूक दिसेनाशी होईल. आमच्या प्राप्तीबरोबर आमची संवेदनाही वाढू दे. आमच्या सुखात इतरांच्या सुखाची जागा असू दे. आणि तुझ्यापुढे फेर धरताना अनुभवलेलं हे एकत्व, आमच्या जगण्यातही अलगद उतरू दे…

…क्रमशः ©️

*******

सचिन देव (अध्यात्मिक व सामाजिक पत्रकार) यांनी लिहिलेला हा विचार मनाला स्पर्श करणारा आणि अंतर्मुख करायला लावणारा आहे. नवरात्रीच्या या पावन काळात भक्तीचा, भुकेचा आणि मानवी संवेदनांचा अत्यंत सुंदर मेळ त्यांनी या लेखनातून घातला आहे. या सुंदर विचाराचे विश्लेषण खालीलप्रमाणे करता येईल:

🌟 *विश्लेषण आणि मुख्य पैलू:संपादक:* *शीतल हरीश रामचंद्र (बुवा) करदेकर*

• भुकेचा व्यापक अर्थ:
लेखक केवळ पोटाच्या भुकेबद्दल बोलत नाहीत, तर ती ज्ञान, अनुभव आणि नात्यांची भूक असल्याचे सांगतात. ही ‘भूक’च माणसाला प्रगतीकडे नेते. पण ही भूक केवळ स्वतःच्या उपभोगासाठी (भोगासाठी) नसावी, तर जीवन समृद्ध करण्यासाठी असावी, हा विचार खूप महत्त्वाचा आहे.
• जाणिवांचा विस्तार (विस्तारता परीघ):
माणूस सुरुवातीला स्वतःचा विचार करतो, मग कुटुंबाचा करतो. पण खऱ्या अर्थाने जगणं तेव्हा समृद्ध होतं जेव्हा माणूस समाज, राष्ट्र आणि सृष्टीचा विचार करायला लागतो. वयाची सत्तरी ओलांडूनही जर माणूस ‘मी आणि माझं’ यातच अडकून राहिला, तर त्याच्या जगण्याचा परीघ विस्तारलाच नाही, हा कटू पण योग्य टोला त्यांनी लगावला आहे.
• फेरी आणि एकत्व (समानतेचा धागा):
नवरात्रीत देवीभोवती धरला जाणारा ‘फेर’ (गरबा/भोंडला) हा केवळ एक उत्सव नाही, तर तो उच्च-नीच, श्रीमंत-गरीब हे भेद विसरून एकत्र येण्याचा सोहळा आहे. हा फेर आणि ही एकतेची भावना केवळ नऊ दिवसांपुरती मर्यादित न राहता आयुष्यभर जपली पाहिजे.
• संवेदना हीच खरी भक्ती:
देवीच्या इतर लेकरांचे (समाजातील घटकांचे) दुःख समजून घेणे, त्यांच्यापर्यंत मदतीचा हात घेऊन पोहोचणे, हीच देवीची खरी भक्ती आहे.

✍️ लेखन शैली:

लेखनाची भाषा अतिशय प्रासादिक, प्रवाही आणि भावपूर्ण आहे. स्तोत्रातील ‘या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता’ या ओळीचा सामाजिक आणि आध्यात्मिक अर्थ ज्या पद्धतीने उलगडला आहे, तो वाचकाला विचार करायला भाग पाडतो.
शेवटी ‘क्रमशः’ लिहिल्यामुळे या वैचारिक मालिकेचा पुढचा भाग वाचण्याची उत्सुकता नक्कीच निर्माण होते. नवरात्रीच्या काळात निव्वळ बाह्य उपचारांपेक्षा अंतर्मनाचा वेध घेणारा हा एक उत्तम लेख आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here