*जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयआर (SIR) चे काम यशस्वीरित्या पूर्ण*
ठाणे,दि.18(जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्हा प्रशासनाने मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अंतर्गत नियोजित कामे अत्यंत नियोजनबद्ध रीतीने आणि शंभर टक्के यशस्वीरीत्या पूर्ण करून मोठा टप्पा गाठला आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या प्रभावी व सातत्यपूर्ण मार्गदर्शनाखाली तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांच्या वेळोवेळी मिळालेल्या सहकार्यामुळे आणि सक्रिय समन्वयामुळे हे उद्दिष्ट वेळेत साध्य झाले आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी, मनपा आयुक्त, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी, बीएलओ साठी नियुक्त सहाय्य्क, पर्यवेक्षक, सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधी, सर्व प्रसारमाध्यम या सर्वांचे सहकार्य लाभले.
मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) अचूक व सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले होते. सर्व बीएलओंचे प्रशिक्षण वेळेत पूर्ण करून त्यांना क्षेत्रीय कामकाजासाठी सज्ज करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्व मतदार यादी भागांचे ईएफ (EF) डाऊनलोड करण्याचे कामही पूर्णत्वास नेण्यात आले.
मतदार यादीनुसार नोंदणीकृत असलेल्या एकूण मतदार 74 लाख 50 हजार 515 मतदारांचे सर्वच्या सर्व 100% टक्के ईएफ (EF) मुद्रित (Print) करण्यात आले. त्यानंतर क्षेत्रीय पातळीवर बीएलओंच्या अथक परिश्रमातून ईएफ डिजिटायझेशनचे कामही प्रशासनाने जलद गतीने पूर्ण करत आतापर्यंत 45 लाख 88 हजार 756 इतके म्हणजेच 61.59% पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण मतदार यादी भाग 6 हजार 894 होते तर एकूण बीएलओ संख्या 6 हजार 894 होती.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी संपूर्ण प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य दिशानिर्देश दिले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी विविध पथकांमध्ये सातत्यपूर्ण समन्वय राखत क्षेत्रीय अडचणी सोडवून कामाला गती दिली.
या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, बीएलओ आणि जिल्हा निवडणूक शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या सांघिक परिश्रमामुळेच हे 100% यश शक्य झाले असून, या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ठाणे जिल्हा प्रशासनाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
00000000




















