*घाटकोपर येथील टिळकमार्ग महानगरपालिका शाळा इमारत संकुलाचे महापौर रितू तावडे, आमदार पराग शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण संपन्न*
बृहन्मुंबई महानगरपालिका एन विभागांतर्गत घाटकोपर (पूर्व) येथे टिळकमार्ग येथे नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक शालेय इमारत संकुलाचे लोकार्पण मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे आणि स्थानिक आमदार पराग शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दिनांक १६ ऑगस्ट २०२६) पार पडले.
या छोटेखानी कार्यक्रमास नगरसेविका राखी जाधव, नगरसेविका अर्चना भालेराव, नगरसेवक धर्मेश गिरी, शिक्षण समिती सदस्य योजना ठोकळे, उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी श्रीमती सुजाता खरे, उपशिक्षणाधिकारी (पूर्व उपनगरे) सायली सुर्वे, एन विभागाचे सहायक आयुक्त जयदीप मोरे तसेच इतर मान्यवर, विद्यार्थी, पालक, स्थानिक नागरिक उपस्थित होते.
महापौर रितू तावडे यांनी भाषणात सांगितले की, मी प्रतिनिधित्व करीत असलेल्या प्रभाग क्रमांक १३२ मधील हे शाळा संकुल आधुनिक व सुसज्ज स्वरूपात बांधण्यात आले आहे. महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) सारख्या संस्थांना भेट देता यावी, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. बीएमसी शाळांमधून घडलेले अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात नाव उज्ज्वल करत आहेत. मी स्वतः आणि उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर या देखील बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेच्या विद्यार्थिनी आहोत, असा उल्लेखही महापौरांनी केला.
त्या पुढे म्हणाल्या, महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगाच्या २७ वस्तू विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये गणित आणि विज्ञान विषयांबाबत आवड निर्माण व्हावी यासाठी ‘सायन्स सोमवार’ आणि ‘गणित गुरुवार’ असे उपक्रम राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांना सकारात्मक व उर्जावान वातावरण मिळावे यासाठी आधुनिक शाळा संकुल उभारण्यात येत आहेत. नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरणारी कामे आम्ही करत आहोत आणि पुढेही करत राहू, असे महापौर तावडे यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान मनोगत व्यक्त करताना स्थानिक आमदार पराग शाह यांनी शाळा संकुलाच्या विविध उपयोगांसाठी वैयक्तिक रुपये ५ लाखांची देणगी जाहीर केली. या नवीन शाळा संकुलाची बांधणी आणि रचना चांगली आहे. परिसरातील स्वच्छता सदैव चांगली राखली जावी. तसेच, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासह सुरक्षिततेकडे अधिकाधिक लक्ष द्यावे, असे आमदार शाह यांनी नमूद केले.
यावेळी इतर मान्यवरांनीही समायोचित मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी शाळा संकुलाविषयी सविस्तर माहिती दिली. या ठिकाणी पूर्वीचे शाळा संकुल बैठ्या स्वरूपाचे होते. नवीन इमारतीमध्ये भरविण्यात येणाऱ्या शाळांमध्ये कामराज नगर, विक्रांत सर्कल, जुना आरटीओ कार्यालय परिसर, जुना रमाबाई सहकार नगर परिसर, राजावाडी हिंगवाला तबेला परिसर, राजावाडी वाल्मिकी परिसर, रेतीबंदर, पिस्टम सागर, नेताजी नगर, छेडा नगर, गारोडिया नगर, टिळकमार्ग परिसर, कामराज नगर, रमाबाई नगर, नालंदा, चेंबूर, विक्रोळी इत्यादी परिसरांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना या नवीन संकुलाचा व त्यातील सुविधांचा चांगला फायदा होत आहे. शाळा संकुल इमारत बांधून पूर्ण झाल्यानंतर आणि शैक्षणिक वर्ष सुरू होताच टप्प्याटप्प्याने शाळा या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्या, असे त्यांनी नमूद केले.
*टिळकमार्ग शाळा संकुल इमारतीची ठळक वैशिष्ट्ये*
टिळकमार्ग महानगरपालिका शाळा संकुलाची नवीन इमारत तळमजला अधिक सहा मजल्यांची आहे. या इमारतीत सध्या चार महानगरपालिका शाळा कार्यरत असून एकूण ७८९ विद्यार्थी (बालवाडी सहित) शिक्षण घेत आहेत.
यामध्ये ३८ वर्गखोल्या, २५ लहान खोल्या, १ सभागृह व १४ इतर सुविधा खोल्यांचा समावेश आहे.
या संकुलात टिळकमार्ग हिंदी (१९७ विद्यार्थी), टिळकमार्ग मराठी (१२८ विद्यार्थी), कामराजनगर हिंदी (३३७ विद्यार्थी) व कामराजनगर मराठी (१२७ विद्यार्थी) अशा चार शाळा कार्यरत आहेत. तसेच इंग्रजी माध्यमाची नवीन बालवाडीही सुरू करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, खगोलशास्त्र प्रयोगशाळा, ग्रंथालय, मनोवैज्ञानिक थेरपी लॅब आणि व्हर्च्युअल क्लासरूम यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
विविध परिसरांतील विद्यार्थ्यांना एकाच छताखाली गुणवत्तापूर्ण, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सर्वसमावेशक शिक्षण मिळावे, या उद्देशाने उभारण्यात आलेले हे संकुल भविष्यातील शिक्षणाच्या गुणवत्तेत नवा मापदंड ठरणार आहे.
***
























