Home मुंबई *एल निनोच्या संभाव्य संकटासाठी महापारेषण सज्ज*

*एल निनोच्या संभाव्य संकटासाठी महापारेषण सज्ज*

26
0

*अखंडित वीजपुरवठा व ग्रिडच्या स्थैर्यासाठी १२ कलमी कृती आराखडा; सर्व मुख्य अभियंत्यांना सतर्कतेचे निर्देश*
———-
मुंबई, दि. ११ : आगामी काळात उद्भवू शकणाऱ्या ‘एल निनो’च्या संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अखंडित वीजपुरवठा आणि ग्रिडचे स्थैर्य कायम राखण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (महापारेषण) विशेष खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या सूचनेनुसार महापारेषणने राज्यातील सर्व परिमंडळांना १२ कलमी कृती आराखड्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

एल निनोच्या संभाव्य परिस्थितीमुळे दीर्घकाळ उष्णतेची लाट, विजेच्या मागणीत वाढ, प्रतिकूल हवामान तसेच वीज यंत्रणेवर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रिडची सुरक्षितता आणि वीजपुरवठ्याची विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विक्रम कुमार यांच्या नेतृत्वाखाली संचालक (संचलन) श्री. सतीश चव्हाण यांनी सर्व परिमंडळांना तातडीने पूर्वतयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यामध्ये सर्व अतिउच्चदाब वीजवाहिन्या, उपकेंद्रे, ट्रान्सफॉर्मर्स, रिअॅक्टर्स, सर्किट ब्रेकर्स, संरक्षण यंत्रणा आणि संबंधित उपकरणांची प्रतिबंधात्मक व स्थिती-आधारित देखभाल पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. वाढत्या वीज मागणीच्या काळात महत्त्वाची पारेषण यंत्रणा सुस्थितीत ठेवून नियोजित वीजबंद कालावधी कमीत-कमी ठेवण्याचे निर्देश आहेत.

वीजवाहिन्या, स्विचयार्ड, ट्रान्सफॉर्मर्स आणि बसबारमधील संभाव्य दोष शोधण्यासाठी थर्मोव्हिजन स्कॅनिंग आणि हॉटस्पॉट तपासणी करून आढळलेले दोष तत्काळ दूर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच संरक्षण प्रणाली, स्काडा, दळणवळण व्यवस्था, पीएलसीसी/ओएफसी नेटवर्क आणि स्टेशन बॅटरीची कार्यक्षमता तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ट्रान्सफॉर्मर्स, कंडक्टर्स, इन्सुलेटर्स, टॉवरचे सुटे भाग आणि इर्मजन्सी रेस्टोरेशन सिस्टीम (ERS) उपकरणांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संवेदनशील पारेषण मार्गांवर गस्त वाढवून झाडांच्या संपर्कामुळे वीजपुरवठा खंडित होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजनाही करण्यास सांगण्यात आले आहे.

व्होल्टेज नियंत्रणासाठी शंट रिअॅक्टर्स, कॅपॅसिटर बँक्स, स्टॅटकॉम्स (STATCOMs) आणि अन्य रिऍक्टिव्ह पॉवर कम्पेनसेशन उपकरणांची उपलब्धता व कार्यक्षमता तपासली जाणार आहे. कोणताही बिघाड झाल्यास तातडीने यंत्रणा पूर्ववत करता यावी, यासाठी आपत्कालीन देखभाल पथके, वाहने, आवश्यक साधने व सुरक्षा उपकरणे २४ तास सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हवामानाच्या अंदाजावर सातत्याने लक्ष ठेवून महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्र (MSLDC), विभागीय भार प्रेषण केंद्रे (RLDC), वीजनिर्मिती केंद्रे आणि वितरण कंपन्यांशी समन्वय साधण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. अत्यंत प्रतिकूल हवामानासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचा आढावा घेण्याबरोबरच स्काडा/ईएमएस (SCADA/EMS) आणि दळणवळण प्रणाली अखंडित सुरू ठेवण्यासाठी सायबर सुरक्षेच्या उपाययोजनाही सक्षम करण्याचे निर्देश आहेत.

या सर्व उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर संबंधित मुख्य अभियंत्यांनी स्वतः लक्ष ठेवावे, तसेच पूर्वतयारीबाबतचा साप्ताहिक अहवाल मुख्य कार्यालयाला सादर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. उपकरणांमध्ये गंभीर बिघाड किंवा ग्रिडमध्ये अडथळा निर्माण झाल्यास त्याची माहिती आणि केलेल्या सुधारात्मक उपाययोजनांचा अहवाल तातडीने मुख्य कार्यालयाला द्यावा, असेही निर्देशात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here