*भारतात Education System आहे की “येडू-केशन” Coaching ?*
🖊️
*दिनेश शिंदे*
९७६९६ ५२५६७
एकेकाळी गुरुकुलात शिक्षण दिलं जायचं. आज “गुरू” आहेत, “कुल” आहे, पण शिक्षण नेमकं कुठे आहे, हा संशोधनाचा विषय ठरू शकतो.
आजच्या शिक्षणव्यवस्थेचं ब्रीदवाक्य बहुधा असं असावं—*“विद्यार्थी घडवायचा नाही; निकाल घडवायचा!”*
शाळेच्या प्रवेशद्वारावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं—“ज्ञान हेच शक्ती आहे.” पण कार्यालयात गेल्यावर पहिला प्रश्न असतो, “फी भरली का?” ज्ञान नंतर, फी आधी. कारण ज्ञानाने शाळा चालत नाही; फीने चालते.
शिक्षणाचा दर्जा मोजण्यासाठी आता एकच निकष उरलाय; बोर्डाचा निकाल. शंभर टक्के निकाल म्हणजे उत्कृष्ट शाळा! विद्यार्थी विचार करतो की नाही, समाजासाठी काही करतो की नाही, त्याला आयुष्य जगता येतं की नाही, हे मोजण्याचं कोणतंच बोर्ड अजून निघालेलं नाही.
आज विद्यार्थी पुस्तकांपेक्षा “गाईड” जास्त वाचतो. गाईडपेक्षा “महत्त्वाचे प्रश्न” जास्त वाचतो. आणि त्याहीपेक्षा *“लीक होणार का?”* या अफवांवर जास्त विश्वास ठेवतो. म्हणजे शिक्षणाचा प्रवास ज्ञानापासून सुरू होऊन शॉर्टकटवर संपतो.
आपल्या देशात परीक्षा हा एक राष्ट्रीय उत्सव आहे. घरात टीव्हीचा आवाज कमी होतो, मोबाईल जप्त होतो, नातेवाईकांना भेटण्यावर बंदी येते आणि विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरून हास्य गायब होतं. निकाल लागला की मात्र सगळे शिक्षणतज्ज्ञ बनतात. प्रत्येक नातेवाईकाकडे एकच प्रश्न—“किती टक्के?” जणू टक्केवारीशिवाय मुलाचं नाव सांगितलं तर सरकारी नियमांचा भंग होईल!
पालकांचंही कौतुक करायलाच हवं. मुलगा जन्माला येताच त्याचं करिअर ठरतं. “हा डॉक्टर होणार.” मुलगा मोठा झाल्यावर म्हणतो, “मला चित्रकार व्हायचं आहे.” त्यावर उत्तर तयार: “छंद म्हणून कर.” आपल्या देशात स्वप्नं ही छंद असतात; करिअर म्हणजे फक्त डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस किंवा परदेश.
शिक्षणात सुधारणा करण्यासाठी दर काही वर्षांनी नवं धोरण येतं. नाव बदलतं, पुस्तक बदलतं, अभ्यासक्रम बदलतो, पण विद्यार्थ्याच्या पाठीवरचं दप्तर आणि डोक्यावरचं दडपण तसंच राहतं. बदल फक्त प्रेस कॉन्फरन्समध्ये दिसतो; वर्गात फारसा नाही.
कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्याला वाटतं, आता तरी आयुष्य बदलेल. पण तिथेही उपस्थिती, असाइनमेंट, प्रोजेक्ट, अंतर्गत गुण आणि प्लेसमेंट यांचं पंचांग सुरू असतं. चार वर्षांनी पदवी मिळते. मग उद्योगजगत विचारतं; “अनुभव आहे का?” *शिक्षणव्यवस्था म्हणते, “आम्ही पदवी दिली.” उद्योग म्हणतो, “आम्हाला कौशल्य हवं.” आणि विद्यार्थी दोघांच्या मध्ये उभा राहून विचारतो, “माझी चूक नेमकी काय होती?”*
शिक्षणाचा उद्देश माणूस घडवणं असतो. पण आपण माणसाला मार्कशीटमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो आहोत. मुलाच्या डोक्यात प्रश्न निर्माण करण्याऐवजी त्याच्या वहीत उत्तरं भरली जात आहेत. जिज्ञासा कमी होत आहे आणि स्पर्धा वाढत आहे.
खरं तर देशाला फक्त परीक्षेत पहिला येणारा विद्यार्थी नको असतो; *देशाला प्रामाणिक डॉक्टर, कल्पक अभियंते, संवेदनशील शिक्षक, जबाबदार नागरिक आणि विचार करणारे माणसं हवी असतात.* पण त्यासाठी शिक्षणाला गुणपत्रिकेच्या चौकटीतून बाहेर पडावं लागेल.
तोपर्यंत मात्र हा प्रश्न कायम राहील;
*आपल्याकडे “Education System” आहे की फक्त “येडू-केशन” Coaching ?*
कारण इथे अनेकदा पदवी मिळते, नोकरी मिळते, पगारही मिळतो… पण शिक्षणाचा खरा अर्थ मात्र शोधावाच लागतो.
तुर्तास इथेच थांबतो.
जय हिंद जय महाराष्ट्र !!


















