महाराष्ट्राच्या शौर्य, परंपरा आणि सामाजिक बांधिलकीची एक अभिमानास्पद झलक आज देशाच्या राजधानीत पाहायला मिळत आहे. “सिंदूर महारक्तदान” यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेकडो पैलवान आणि कार्यकर्ते दिल्लीत दाखल होत, मानवतेचा अनोखा संदेश देत आहेत. ही केवळ यात्रा नसून महाराष्ट्राच्या रक्तात असलेल्या सेवाभावाची आणि देशप्रेमाची जिवंत साक्ष आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे आणि संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य महारक्तदान मोहीम साकार होत आहे. महाराष्ट्र क्रीडासेनेचे प्रमुख चंद्रहार पाटील यांच्या पुढाकारातून ही यात्रा दिमाखात दिल्लीत पोहोचली असून, सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
महाराष्ट्राच्या मातीत घडलेले, आखाड्यात आपल्या पराक्रमाची छाप पाडणारे शेकडो पैलवान आज एका वेगळ्याच लढाईसाठी उभे ठाकले आहेत—मानवतेच्या रक्षणासाठी. रक्तदानाच्या माध्यमातून ते देशसेवेत आपले योगदान देत आहेत. गेल्या वर्षी जम्मूमध्ये या मोहिमेने विक्रम घडवला होता आणि यंदा दिल्लीत त्याहून मोठा विक्रम करण्याचा निर्धार या सर्वांनी केला आहे.
या महारक्तदान शिबिराचे विशेष महत्त्व म्हणजे, येथे संकलित होणारे रक्त भारतीय सैन्याला पुरवले जाणार आहे. देशाच्या सीमांवर रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी हे योगदान अत्यंत मोलाचे ठरणार आहे. त्यामुळे ही मोहीम केवळ सामाजिक कार्य न राहता, राष्ट्रसेवेचा एक प्रभावी उपक्रम ठरत आहे.
या सर्व उपक्रमामागे मा. ना. उदय सामंत यांचे मोठे योगदान असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आयोजन अत्यंत सुयोग्य पद्धतीने पार पडत आहे. “कोकणाचा नेता” म्हणून ओळखले जाणारे उदय सामंत यांनी दिल्लीच्या तख्तावर पोहोचून रक्तदानाच्या माध्यमातून सैनिकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे, ही कोकणासाठी अभिमानाची बाब आहे.
भारतीय सैन्याला रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत दिल्लीच्या तख्तावर महारक्तदान शिबिरासाठी ना. उदय सामंतांच्या रूपाने कोकणचा सह्याद्री अभिमानाने धावला आहे.
आज दिल्लीच्या भूमीवर उभा राहून महाराष्ट्र पुन्हा एकदा सांगतो आहे — शौर्य, सेवा आणि समर्पण हीच आमची खरी ओळख आहे.























